Sunday, February 10, 2013

४२ अनाथ मुलांचे पालकत्व निभावणारा खराखुरा मिस्टर इंडिया!

मराठवाडय़ातील बीड जिल्ह्य़ातील गेवराई तालुक्यात २७ वर्षीय संतोष गर्जे या युवकाने सहारा अनाथालय सुरू केले आहे. या ठिकाणी तब्बल ४२ अनाथ मुलांचा सांभाळ तो करत आहे. परिस्थितीचे लक्ष्य ठरलेल्या या अनाथ मुलांचे पालकत्व पत्करलेल्या संतोषचे काम नक्कीच दखल घेण्याजोगे आहे.

सुमारे २५ वर्षांपूर्वी शेखर कपूर दिग्दर्शित एक चित्रपट आला होता- मिस्टर इंडिया! अनिल कपूर एका भाडय़ाच्या घरात काही अनाथ मुलामुलींना जगण्याची हिंमत देऊ करण्यासाठी तारेवरची कसरत करत असतो. तो चित्रपट पाहताना त्या मुलांबद्दल आणि अनिल कपूरबद्दल कणव दाटून येते. या चित्रपटाचा शेवट गोड होतो आणि ही एका चित्रपटाची कथा होते, अशी मनाची समजूत घालत आपण घरी परततो. पण अनिल कपूरची भूमिका वास्तवात निभावणारा एक युवक गेली आठ वष्रे अनाथ मुलांच्या सांभाळासाठी खरोखरीच तारेवरची कसरत करतोय.. त्याचे नाव संतोष गर्जे.
हल्लीच्या तरुणांना समाजभान नाही, असा आरोप सरसकट केला जात असतो. मात्र देशाच्या कानाकोपऱ्यात आजही अशी अनेक युवा मंडळी आहेत जी फक्त आणि फक्त समाजातील गरजवंतांसाठी झटत आहेत. मराठवाडय़ातील बीड जिल्ह्य़ातील गेवराई तालुक्यात संतोष गर्जे नावाचा २७ वर्षीय मिस्टर इंडिया तब्बल ४२ मुलांचे पालकत्व निभावत आहे. तो मूळचा बीड जिल्ह्य़ाच्या आष्टी तालुक्यातील पाटसर गावचा रहिवासी आहे. संतोषच्या घरची परिस्थिती हलाखीचीच होती. मुकादमाकडून घेतलेलं कर्ज आणि घरात तीन बहिणी. अशाही परिस्थितीत घरच्यांनी दोन बहिणींची लग्न लावून दिली. आई-बाबा सहा महिने कारखान्यावर कामाला असायचे. त्यामुळे घरात केवळ संतोषपेक्षा मोठी शेवटची बहीण आणि तोच असायचा. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करायचा, गावाकडची शेती बघायची आणि महाविद्यालयात जायचं. असं करत संतोषने आष्टी कॉलेजमधून बारावीपर्यंत विज्ञान शाखेतील शिक्षण पूर्ण केलं. बहिणीच्या लग्नापर्यंत तिच्यासोबत गावाकडे एकटय़ानेच राहिल्याने दोघांचं नातं हे बहीण-भाऊ यापेक्षा आई-मुलाचंच होतं. लवकरच तिचंही लग्न झालं. तिला पहिली मुलगी झाली. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. दुसऱ्या बाळंतपणात बहीण सात महिन्यांची गर्भार असताना तिचा मृत्यू झाला. मुलीचं जाणं बापाच्या जिव्हारी लागलं आणि संतोषचे वडील घर सोडून गेले. हेच कमी म्हणून की काय, बहिणीच्या नवऱ्याने लगेच दुसरं लग्न केलं. आई-बापाचं छत्र हरपल्याने बहिणीची एक वर्षांची मुलगी अनाथ झाली. संतोषवर आभाळ कोसळलं. पण डगमगून जाण्यात अर्थ नव्हता. तो औरंगाबादला गेला. तिथे पाच हजारांच्या पगारावर काम करायला सुरुवात केली. पण बहिणीच्या अनाथ मुलीचा प्रश्न त्याच्या डोक्यात कायम रुंजी घालत असायचा. आपल्या भाचीच्या डोक्यावरचं मायेचं छप्पर जसं हरवलं तशी अनेक अनाथ मुलं मायेच्या शोधात फिरत असतील, हा विचार त्याला स्वस्थ बसू देईना. दरम्यान, गेवराईचं नाव या ना त्या कारणाने सतत वर्तमानपत्रात येतं होतंच. त्याने तडक गेवराई गाठलं. तिथे एका पत्र्याच्या दुकानदाराकडे गेला. जवळपास पंच्याहत्तर पत्रे उधारीवर घेतले. स्वत:चं घर उभं केलं आणि अनाथ मुलांच्या शोधात निघाला. पहिल्या चार-पाच दिवसांमध्येच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेली सात मुलं सापडली. त्याने त्यांना आपल्या घरी आणून त्यांचा सांभाळ करायला सुरुवात केली. भाडय़ाने शेती घेतली आणि मग सुरू झाला एक न थांबणारा खडतर प्रवास. वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, तुरुंगात गेलेले पालक, आईने सोडलेली मुलं, व्यसनं असलेले पालक, आजोळी ठेवलेली मुलं, मामा सांभाळ करत नाही, आई-बाबा वारलेले, छळ करणारी सावत्र आई, अनतिक संबंधांतून जन्माला आलेल्या अशा तब्बल ४२ मुलांचा सांभाळ आज संतोष करतोय. कधी कुणी आणून सोडतं तर कधी संतोषला एखाद्याबद्दल कळलं तर तो त्यांना घेऊन येऊन आपल्या परिवारात सामील करतो. लोकमान्यतेसाठी २००७ साली संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं. २०११ पासून सरकारी कायद्यानुसार काम सुरू झालं असलं तरी संतोषने हे ब्रह्मचारी पालकत्व स्वीकारलं ते २००४ साली.  
संतोषच्या कुटुंबामध्ये तो सर्वात जास्त शिकलेला मुलगा. चार लोकांमध्ये वावरलेला. त्यामुळे काम करताना घरच्यांचा फार अडथळा नाही आला. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्याने घरच्यांकडून कसलीच मदत झाली नाही. घरच्यांकडे लक्ष दिलं तर हे काम करणं अशक्य आहे, म्हणून त्याने घराकडे पूर्ण पाठ फिरवली. गेवराईमध्ये काम करायला सुरुवात केली. गेवराई हा बीड जिल्ह्य़ातील सर्वात मागासवर्गीय जिल्हा. इथे पारधी, बंजारा, भिल्ल, कैकाडी, वडारी समाजाचे लोक अधिक आहेत. या जिल्ह्य़ात ऊसतोड कामगारांची संख्या मोठय़ा प्रमाणात. अशिक्षितपणामुळे बालविवाहाचं प्रमाणही जास्त. औरंगाबाद आणि जालनादरम्यानच्या मुख्य रस्त्याला गेवराई आहे. त्यामुळे या रस्त्याला वाहनांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. तसेच या जिल्ह्य़ातला सर्वात मोठा रेड लाइट एरियाही याच भागात आहे. अशा ठिकाणी ज्या मुलांच्या डोक्यावर कुणाचाच हात नाही त्यांना जेवायला घालायचं आणि शिकवायचं संतोषने ठरवलं. ज्या ठिकाणी कामाची खरंच गरज आहे, त्या ठिकाणीच काम करायचं हे आधीपासून त्याच्या डोक्यात पक्कं होतं. म्हणून संतोषने गेवराईची निवड केली आहे. सहारा बाल अनाथाश्रम असं प्रकल्पाचं नाव ठेवलं. पहिली दोन र्वष खूपच हाल झाले. घर मालकाला द्यायला पसे नसायचे. महिन्याचा किराणा संपला की गावात फिरून धान्य मागावं लागायचं. कधी कधी नसत्या भानगडीत पडलो, असं वाटायचं. पण कामाचे व्रत पत्करले  होते. दुकान, शाळा, महाविद्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत सगळीकडे मदतीसाठी तो फिरायला लागला. काही वेळा लोक हाकलून लावायचे, काही शांतपणे ऐकून घ्यायचे, पण मदत करायचे नाहीत. आम्ही तुझ्या प्रकल्पाला भेट देऊन मदत करू, असं आश्वासन द्यायचे. पण यायचं कोणीच नाही. काही ठिकाणी लोक खूप मदत करायचे. प्रत्येक वर्षी मुलं वाढत होती. प्रत्येक मुलाची गोष्ट मन दुखावणारी होती. पण याच सगळ्या गोष्टी संतोषला अधिक जोमाने काम काम पुढे न्यायला कारणीभूत ठरल्या.
कामाला सुरुवात केल्यापासून संतोषला अनेक बरे-वाईट अनुभव आले. २००७ साली बीडमधील केस तालुक्यामध्ये एका हॉटेलमध्ये राहिला असताना तिथे धाड पडली. त्या हॉटेलमध्ये अनतिक प्रकार चालत असत. पोलिसांनी संतोषलाही ताब्यात घेतलं. खिशात पसे नव्हते म्हणून इथे राहिलो अशी प्रांजळ कबुली संतोषने दिली, पण कुणीच ऐकून घेईनात. मग संस्थेच्या कामाच्या पावत्या, खर्च दाखवला तेव्हा कुठे पोलिसांनी सोडलं. ''आज प्रकल्पामधल्या वाटीपासून टेबलपर्यंत सर्व गोष्टी मागून गोळा केलेल्या आहेत. प्रत्येकाच्या मागे एक गोष्ट आहे. कधी कधी चार दिवस जेवलेलो नाही. एका वर्षी तर तब्बल १७ दिवस अनाथालयातील सर्वजण वरण-भात आणि खिचडीवर होते. साधी माचिसची काडी घ्यायला पसे नव्हते. मग माचिस चोरावी लागली. त्यानंतर संध्याकाळी जेवण बनवून खाता आलं सगळ्यांना,'' संतोष सांगत होता.
संतोषने अनेक वेळा फक्त संध्याकाळच्या वेळेस चहा-बिस्किटं किंवा पाणी-बिस्किटं खाऊनही दिवस काढलेत. विजेचं बिल जास्त येईल म्हणून आठ वाजताच दिवे बंद करून झोपायचो, पण झोप लागायची नाही. एकदा माजलगावच्या एका ढाब्यावर एका चपातीचे पसे जास्त लावले, म्हणून त्याला भांडण करावं लागलं होतं, पण परिस्थितीच अशी होती की, इलाज नव्हता. नातेवाईकांकडे मदत मागायची, तर ते त्यांचीच रडगाणी सांगायचे. काही वर्षांपूर्वी बहिणींकडून घेतलेले कर्जाचे पैसे अजूनही संतोषला देता आलेले नाहीत. याचा सल रोज त्याला छळतोय. संतोष गेली सात र्वष दिवाळीला घरी गेलेला नाही. एका मातेच्या पोटी जन्माला आलेला कर्तृत्ववान मुलगा म्हणून गेल्या वर्षी संतोषच्या आईला 'मातृत्व पुरस्कार' मिळाला तेव्हा त्या पहिल्यांदा गेवराईला आल्या होत्या. पण आपला मुलगा नक्की काय काम करतो याची त्याच्या आईला अजूनही कल्पना नाही. तो फक्त मुलं सांभाळतो एवढंच तिला कळतं.  
संतोषला फार मित्र कधीच नव्हते. मग पुस्तकं त्याचे मित्र बनली. भटकंतीमधून वेळ मिळाला किंवा प्रवासात पुस्तक वाचायचा. त्यातून खूप आधार मिळाल्याचं तो सांगतो. नगर परिषदेच्या वाचनालयात कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे वाचून काढल्या. पुस्तकामुळे कळलं की, आपल्याआधी अशा प्रकारे अनेकांनी आयुष्य व्यतीत केलं आहे आणि आजही जगत आहेत. या सर्व कामात संतोषला अनाथालयातील मुलांची खूप मदत मिळाली. त्यांची कशाबद्दल तक्रार नसते. संतोषही मुलांचा त्रास कमी कसा होईल, याची काळजी घेतो.
२००७ साली 'आई' नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आला आणि त्याच्या सहारा अनाथालय परिवाराचं काम पद्धतशीरपणे सुरू झालं. पण सरकारी फाइलींमध्ये तो अडकला. २०११ पासून सरकारी कायद्यानुसार या प्रकल्पाचं काम सुरू झालं. पण प्रकल्प कसा चालवायचा याची पद्धतशीर माहिती त्याला नव्हती. त्यामुळे संतोषने काही संस्थांना भेटी देऊन त्यांचं काम समजून घेतलं. आजच्या घडीला अनाथलयाला जे नियम असतात, ते सर्व त्याच्या प्रकल्पात पाळले जातात.  मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवायचं त्याने ठरवलं आहे. त्यामुळे मुलांना शिस्त लावली, पण ती उपदेश करून नव्हे. मुलांचे गट पाडून त्यांना संतोष काम वाटून देतो. अनाथालयातील बरीचशी कामं मुलं सांभाळतात. गेली दोन-अडीच वर्षे पहिली ते बारावीपर्यंतची मुलं या अनाथालयात आहेत. इथल्या मुलांमध्ये परस्परांमधील नात्याचे बंधही बळकट झाले आहेत. आपल्याच कृतीतून ती शिकत असतात.  
या प्रकल्प उभारणीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गोरक्षनाथ डोंगरे हा मित्र संतोषबरोबर आहे. संतोष कामासाठी बाहेरगावी असताना प्रकल्पाची जबाबदारी तो निभावायचा. सध्या स्वत: संतोष, गोरक्षनाथ, संभाजी सोनवणे, स्वयंपाकासाठी जाधव ताई, बायको प्रीती असे पाच जण प्रकल्पाचे पूर्णवेळ काम पाहतात. संतोषची बायको प्रीती फेब्रुवारीपासून सक्रिय झालेली आहे. त्याच्या कामाला समजून घेणारी बायको त्याला हवी होती. ती प्रीतीच्या रूपाने मिळाली. प्रीती सध्या कायद्याचं शिक्षण घेत आहे.
संतोषला त्याच्या वयाची मुलं उडानपणा करताना दिसायची. पण त्याचं त्याला काही विशेष वाटायचं नाही. सर्वच असे नसतात या मतावर संतोष ठाम होता. अशातच अभय बंग आणि राणी बंग यांच्या सर्चमधील निर्माणच्या शिबिराची माहिती झाली. तिथे अनेक चांगल्या समविचारी तरुणांशी त्याच्या ओळखी झाल्या. आता ते सर्वजण संतोषला कामात खूप मदत करतात. काहीजण भाजीपाला पाठवतात, पसे देतात. आणि ते नाही दिलं तरी मानसिक आधार खूप मिळतो, असं संतोष सांगतो. आता हरीष जाखेते, सुशील पिपाडा, महेंद जाखेटे या त्याच्याच काही मित्रांनी मिळून पसे काढून गेवराईपासून दोन-अडीच किलोमीटरवर संतोषला संस्थेसाठी जागा घेऊन दिली आहे. आज त्याचा प्रकल्प भाडय़ाच्या घरात सुरू आहे.
नवीन जागी तिथे येणाऱ्या मुलांना जीवनशैलीशी निगडित शिक्षण मिळेल अशा सुविधा येथे संतोषला उभारायच्या आहेत. भविष्यात त्या जागेत कमीत कमी दोनशे जण राहू शकतील अशी व्यवस्था करायची आहे. इथून बाहेर पडलेल्या मुलांना आपल्या हक्काच्या घरी कधीही येता येईल अशी सुविधा त्याला देऊ करायची आहे. त्याशिवाय छोटी झाडांची नर्सरी, हस्तकलेच्या वस्तू बनवायचा प्रकल्प, कार्यालय, ग्रंथालय यांचा प्रकल्पाच्या इमारतीमध्ये समावेश करण्याचा त्याचा मानस आहे. या संपूर्ण प्रवासात अमरावतीच्या 'प्रयास' संस्थेचे अविनाश सावजी, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, गिरीश कुलकर्णी, प्रकाश आणि विकास आमटे यांसारख्या व्यक्तींचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे संतोष आवर्जून सांगतो.
संस्थेचे संकेतस्थळ - www.aaifoundation.org.in

No comments: