फार पुर्वी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, एक प्रसिध्द इंग्रजी लेखक मुंबईत आला होता आणि मुंबईतील धोबी घाटाचं वर्णन करताना तो म्हणाला होता की इथे रोज सकाळी काही लोक ओल्या कपड्याने काळा दगड फोडायचा प्रयत्न करतात, दगड फुटत नाही पण प्रयत्न त्याच जोमाने चालू राहतो. हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच किरण राव दिग्दर्शित ‘धोबी घाट (मुंबई डायरीज्)’ हा चित्रपट पाहिला. वर नमूद केल्याप्रमाणे त्या इंग्रजी लेखकाने मुंबईच्या माणसांवर, त्यांच्या स्वभावावर भाष्य केलं होतं. ‘धोबी घाट’मध्ये सुध्दा तेच आहे. दोन तासांहून कमी लांबीचा, मध्यांतर नसलेला हा चित्रपट एक वेगळी छाप सोडून जातो. अंतर्मुख होऊन आपला आपल्याच विचार करायला भाग पाडतो. चित्रपटातील सर्वच कलाकारांची कामे उत्कृष्ट झाली आहेत. मुख्य म्हणजे आवश्यक तेवढेच संवाद आणि संगीताचा योग्य वापर यामुळे मुंबईची ही डायरी उत्तरोत्तर अधिकच रंगतदार होत जाते.
जगाच्या नकाशावर मुंबईला एक वेगळं अस्तित्व आहे. इथल्या लोकांबाबत फार पुर्वीपासून सर्वांना कुतूहल वाटत आलंय. त्यांचं राहणीमान, त्यांचे स्वभाव, जगण्याची पध्दत हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जगभरातल्या पर्यटकांबरोबरच, भारतातल्या कुठल्याही गावातील असो वा शहरातील व्यक्तीस मुंबईला आवर्जुन भेट द्यायची असते. तिथे राहणारा माणूस कितीही गरीब असला तरी त्याबद्दल त्याला अप्रूप असतं. म्हणूनच घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या मुंबईच्या माणसाच्या भाव-भावनांचं चित्र रेखाटणं आव्हानात्मक काम आहे. ‘धोबी घाट (मुंबई डायरीज्)’ मध्ये किरण राव यांनी हे आव्हान यशस्विरित्या पेलल्याचं दिसतं. चित्रपटातील चारही प्रमुख भूमिकांच्या माध्यमातून मुंबईचं अस्सल रूप समोर येतं. खरं तर चित्रपटातील गोष्टी या नवीन नसून त्या ज्या पध्दतीने मांडल्या गेल्या आहेत, ते वाखाणण्याजोगं आहे. कुठेही भंपकपणाचा आव न आणता, कमीत कमी पात्रांद्वारे आणि उत्कृष्ट पटकथेमुळे ह्या चित्रपटात अनेक प्रसंगांनंतर वाह...क्या बात है! हे बोलायला भाग पाडतो, यातंच त्याचं यश लपलेलं आहे.