Thursday, October 21, 2010

फूल मूनच्या साक्षीने

तुम्हाला काय प्यायचंय ते प्या रे. मी माझी व्यवस्था केलेली आहे.
गौरव फोनवर बोलत असतानाच कोणीतरी दाराची बेल वाजविली, तर दार उघडताच सोसायटीतल्या चिल्ल्या-पिल्ल्यांच्या टोळीने एकच कल्ला केला. सर्वाना शांत करीत गौरवने विचारले, काय हवंय?
टोळीचं नेतृत्व करणारा चिंटू म्हणाला, कोजागिरीची वर्गणी.
किती? गौरवने विचारले,
चिंटू म्हणाला, पन्नास रुपये फक्त.
गौरवने विचारलं, काय करणार पन्नास रुपयांचं?
चिंटू म्हणाला, भरपूर मसाला दूध पिणार. आणि जोडीला सामोसे आणि चिप्स पण ठेवले आहेत त्याचं काय? गुड्डीने चिंटूकडे डोळे वटारूनच पुस्ती जोडली.
दूध??? असं म्हणत गौरव हसत हसतच आत गेला आणि पन्नास रुपये आणून देऊन चिंटूच्या हातावर ठेवत म्हणाला, जा मजा करा, दूध प्या आणि पुन्हा मोठय़ाने हसतच त्याने होल्डवर ठेवलेला फोन कानाला लावला. फोन कानाला लावताच समोर फोनवर असलेल्या शरदने विचारले, असे हसतोयस का?
गौरवने लागलीच झालेला प्रकार सांगितला. दूध पिणार म्हणे भरपूर, असं म्हणत, पुन्हा हसायला लागला. आपण तर बाबा खंबे तयार ठेवले आहेत. चल उद्या भेटू असं म्हणत, नेहमीसारखा उशीर करू नकोस सांगत गौरवने फोन कट केला.
हिंदू कालमानानुसार हा अश्विन महिना आणि त्यात येणारी पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी
पौर्णिमा. पौर्णिमेच्या रात्री जागं राहणे म्हणजे कोजागर, म्हणे आज जागे राहतात त्यांना लक्ष्मी धन वाटते; पण या गोष्टीशी कसलंच घेणं-देणं नसलेल्या गौरव आणि त्याच्या मित्रांनी कर्जतला शरदच्या फार्म हाऊसवर पार्टी (म्हणजेच दारुची) करण्याचा बेत आखला होता. दूध वगैरे लहान मुलं पितात. आपले तर आता गर्लफ्रेंड बरोबर मस्त चांदण्या रात्रीचा आनंद लुटत चीअर्स करण्याचे दिवस आहेत. असं त्यांचं म्हणणं होतं.
ठरल्याप्रमाणे गौरव, शमिका, शरद, कौमुदी, राजा, संतोष, मोनिका, सोडा म्हणजेच गिरीश, तानिया, टोपी, केतकी असे सर्व जण एकत्र जमले. फार्म हाऊसला एक मोठा बगीचा होता, मोठं टेरेस आणि अगदी दोनशे मीटरच्या अंतरावरून वाहणारी नदी होती. त्यामुळे या वेळेची पार्टी भलतीच रंगणार म्हणून सर्व जण खुशीत होते. शरद सतत किचनमध्ये का फेऱ्या मारतोय म्हणून गौरव किचनमध्ये गेला आणि शरदने गॅसवर दूध तापवायला ठेवलंय हे पाहून मोठमोठय़ाने हसू लागला, त्या आवाजाने सर्व जण काय झालं हे बघायला किचनमध्ये जमा झाले.
काय झालं रे एवढं मोठय़ाने हसायला? रोहनने विचारलं, चांगला मूड क्रिएट होत होता आणि तू सगळा सत्यानाश केलास. असं म्हणताच केतकी लाजली.
काही नाही रे, हा बघ ना, फ्रिजरमध्ये बीअर चिल्ड करायला ठेवायची सोडून दूध गरम करतोय. बच्चा कुठचा.
तू काहीही म्हण, पण मी दूध पिणार. अरे त्यात वेगळी मजा असते, तुम्हा दारू पिणाऱ्यांना नाही कळणार, असं म्हणत शरद पुन्हा हातातील चमच्याने ते ढवळून किती घट्ट झालंय आणि केशर ड्रायफूट नीट मिक्स झाले आहेत ना याचा अंदाज घेऊ लागला.
रम, वोडका, विस्की, बीअर, टकिलाच्या बाटल्या टेबलावर दिमाखात उभ्या होत्या आणि जोडीला चकणा होताच. प्रत्येकाने आपापला पेग तयार केला. सर्व तयारी झाल्यावर सर्व जण अंगणात गोल करून बसले होते. इतक्यात शरद मगाशी गॅसवर तापत असलेलं गरमा गरम दुधाचं पातेलं दोन्ही हातात पकडून घेऊन आला. त्याच्या आगमनानेच मसाला दुधाच्या सुंदर वासाने सारा परिसर दरवळून गेला. त्यानं पातेलं सर्वाच्या मधोमध ठेवलं आणि चंद्राचा अंदाज घेऊ लागला. कौमुदी त्याला मदत करीत होती. सर्व जण आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते. शरदने अगदी योग्य अंदाज घेऊन पातेलं ठेवलं होतं. पूर्ण गोल चंद्राचं अगदी छान, मनमोहक प्रतिबिंब त्यात पडलं होतं. सर्व जण मगाशी शरदला हसले असले तरी या गोष्टीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला. ठपाठप अंधारात कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकले. तिथे टोपी आधीच टाइट झाल्याने, तो पातेल्यामध्ये आपला चेहरा पाहून म्हणाला, सांका कोण दिसतोय चंद्रासारखा? मी की चंद्र? यावर सगळेजण खळखळून हसले आणि सर्वानी चीअर्स केलं.
बाटल्या अध्र्याहून अधिक रिकामी होईपर्यंत सर्व जण एकत्रपणे मजा-मस्करी करीत होते. विनोदी किस्से सांग, जुन्या आठवणींना उजाळा दे, मध्येच टोपीची टेर खेचा हे सर्व झाल्यावर सर्व जण आपापला कोपरा शोधू लागले. अट फक्त एकच, तिथून चांदणं दिसलं पाहिजे. संध्याकाळी अचानक पडून गेलेल्या पावसामुळे हवेत बऱ्यापैकी गारवा होता. त्यामुळे सर्वानी वरुण राजाचे आभार मानले होते. कारण हाच गारवा चांदण्यारात्री खरी धमाल आणणार होता.
पिऊन टुन्न असताना आणि चंद्राकडे बघत गळ्यातगळे घालून पुन्हा एकदा मरेपर्यंत एकत्र राहण्याच्या शपथा घेतल्यानंतर सुखी संसाराची स्वप्नं रंगवत असताना सगळी जोडपी कधी झोपी गेली ते त्यांचं त्यांनासुद्धा कळलं नाही; पण एक जोडपं जागं होतं. शरद आणि कौमुदी. आपल्या आवडत्या गरम दुधाचा आस्वाद घेतल्यानंतर हे दोघे केव्हाच तिथून बाहेर पडून नदी किनारी येऊन बसले होते. एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून, संथ वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा आवाज ऐकत चांदण्या रात्री एकटक त्या फूल मूनकडे पाहत सूर्याचं पहिलं किरण पडेपर्यंत.