उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचलचा अंतर्गत भाग आजदेखील अनेक बाबतीत दुर्गमच आहे. या प्रदेशात पर्यटकदेखील फारसे भेट देत नसताना, सात मराठी सायकलस्वारांनी मात्र मनसोक्त सायकली दौडवून अनोखी दिवाळी साजरी केली.
असा झाला सायकल प्रवास
सोळा दिवसांमध्ये साधारण साडेसातशे किलोमीटर सायकलिंग झाले. साडेसात हजार फुटांवरून सुरुवात केल्यानंतर आम्ही जवळपास साडेआठ फुटांपर्यंत सायकल वरून आलो. मुंबई-कोलकाता-दिब्रूगढ (आसाम) असा विमानप्रवास केल्यानंतर, दिब्रूगढच्या मोहनबारी विमानतळ ते तिनसुखिया हा तीस किलोमीटरचा प्रवास टेम्पोमध्ये पॅक केलेल्या सायकल टाकून केला. दुसऱ्या दिवशी तिनसुखिया (आसाम) ते अरुणाचल प्रदेश आणि आसामची सीमारेषा असलेल्या दिराक गेटपासून सुरू झालेला सायकल प्रवास भारत-चीन सीमारेषेला भोज्जा करून, म्यानमारमध्ये साधारण १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून पुन्हा एकदा आसाममधील तिनसुखिया या शहरात येऊन थांबला. दिराक गेट - तेजू - सलंगम - हायलिआंग - चांगवन्ती - वालाँग आणि परशुराम कुंडावरून परत येताना ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान बांधण्यात आलेल्या स्टिलवेल किंवा लिडो रोडवरून सायकलिंग केलं. याच रस्त्यावर असलेल्या लेखापानी या सद्य:स्थितीत सुरू नसलेल्या ईशान्येकडील भारताच्या शेवटच्या रेल्वे स्थानकालाही भेट दिली.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा : उगवत्या सूर्याचा प्रदेश
तिथून सायकलिंग करतच पांगसाऊ पासपर्यंत गेलो. हा पास भारत आणि म्यानमारच्या सीमेवर आहे. तिनसुखियापर्यंतच्या परतीच्या प्रवासात जयरामपूर तसेच दिगबोईमध्ये असलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या स्मारकाला आणि ज्या ठिकाणी भारताला पहिल्यांदा तेल सापडलं त्या जागी उभारण्यात आलेल्या म्युझियमलाही भेट दिली. वाटेत वाक्रो - जागून - खरसांग - जयरामपूर - मार्गारेटा - तिनसुखिया करत पुन्हा एकदा मुंबईसाठी दिब्रूगढहून आकाशाच्या दिशेने झेपावलो.