मीरा - ब्लॅक कॉफी बिना चिनी के, लडकीयोंको इंप्रेस करने के लिए?
जय - तुम तो ज्यादा इंप्रेस नही लग रही हो?
मीरा - आय फील लाईक प्युकींग...यककक
लव आज कल चित्रपटातील सैफ अली खान आणि दिपिका पदुकोने मधला हा संवाद. चित्रपटात दाखवलं जाणारं सर्वच काही खरं नसतं, पण या प्रसंगानंतर थिएटरमध्ये उपस्थित असलेलं प्रत्येक जोडपं एकमेकांकडे बघतं आणि मिश्किलपणे हसतं. कारण त्या प्रसंगामध्ये बऱ्याच जुन्या आठवणी घर करून असतात.
हल्ली पहिल्या डेटींगसाठी भेटायचा हॉट स्पॉट म्हणजे कॉफी शॉप. त्यामुळे तुम्ही ज्या प्रकारची कॉफी मागवाल त्यावरून तुमचा स्वभाव जज केला जातो. त्यामध्ये अर्ध्याहून अधिक मुले एक्सप्रेसो (विदाऊट शुगर) किंवा अडल्ट हॉट चॉकलेट (फ्लेवर्ड विथ रम ऑर आयरीश क्रिम), तर मुली हॉट चॉकलेट (डार्क एन्ड स्ट्रॉग) किंवा कॅफे फ्रेडो (आइस कॉफी) ऑर्डर करतात. दोघानांही आपल्या ऑर्डर वरून आपला स्वभाव (खरा-खोटा) एकमेकांच्या लक्षात आणून द्यायचा असतो. पण खरी मजा तर पुढे येते, जेव्हा धाडस करून मागवलेली ती न आवडणारी कॉफी कडू किंवा फारच कोल्ड वाटायला लागते. मग काय, जिवावर आल्यासारखं एक एक घोट घेऊन खोटी स्माईल द्यायची आणि प्रसंग मारून न्यायचा, कारण तोपर्यंत समोरच्याचा खरा स्वभाव काय आहे याबाबत डोक्यात चक्र फिरायला लागलेली असतात. त्यामुळे तुमचा खरा स्वभाव हा तुम्ही कोणती कॉफी ऑर्डर करताय यावरून खरंच लक्षात लक्षात येतो का? तर त्याचं उत्तर ‘हो’ असंच देता येईल. कारण हा पहिला प्रसंग संपुर्ण चित्र क्लीअर करतो.
दुसऱ्या भेटीत मग प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार ऑर्डर प्लेस करतात. मग मुलगा कॅफे लाटे (एक्सप्रेसो, मिल्क आणि फोम) आणि मुलगी कॅपॅचिनो (एक्सप्रेसो, मिल्क, फोम) मागवायला लागते. त्यानंतरच्या भेटींमध्ये मात्र मग व्हरायटी असते. प्रत्येकजण आपल्या रेग्युलर ब्रँडकडे वळतो आणि मग खऱ्या स्वभावानुसार (खिशाला काय परवडतंय, आपल्या पार्टनरला काय आवडतंय, क्वान्टीटी कशाची जास्त येते, कशाबरोबर एक्स्ट्रा क्रिम/चॉकलेट आहे किंवा मग आज काहीतरी नवीन ट्राय करूयात) यानुसार एक्सप्रेसो कॉन क्रिमा, कॉपीक्युनो, आईस एस्कीमो, हॉट मोका – विथ चॉकलेट सिरप, कॅरॅमल लाटे, चॉकलेट फॅंटसी, आयरीश कॉफी, कोल्ड कॉफी, फ्लेवर्ड कॉफी (चॉकलेट, आयरीश, कॅरॅमल), ब्लॅक कॉफी (एक्सप्रेसो, अमेरीकॅनो/रीस्ट्रेटो), ट्रॉपीकल-आईसबर्ग, हॉट चॉकलेट (थिक) ची ऑर्डर होते. अनेकवेळा तुमच्या भेटायच्या फेव्हरेट ठिकाणी व तिथल्या फेव्हरेट टेबलावर ऑर्डर न देताच फक्त इशाऱ्यावरूनच ऑर्डर येते, कारण तुम्हा दोघांव्यतिरिक्त तिथल्या वेटरलासुध्दा तुमचा स्वभाव लक्षात आलेला असतो. आणि गंमत म्हणजे म्हणूनच वेळ-प्रसंग बघून स्वभावानुसार कधी कधी तो पण नवीन नवीन ऑर्डर सुचवत असतो.
या जोडप्यांबरोबरच कॉफी शॉपमध्ये कोपरा अडवून बसलेलेलीही बरीचशी मंडळी असतात. कुणी पुस्तक वाचत, कुणी गिटार वाजवत, कुणी काही लिहीत, लॅपटॉपवर काम करत, तसेच फक्त बर्ड वॉचिंगलाही बरीच मंडळी नित्यनियमाने येऊन बसत असतात. पण मग त्यांच्या ऑर्डर्स या अनेकदा ठरलेल्या किंवा कॅफे मधल्या एकंदरीत वातावरणावरून ठरत असतात. उदा. बाजूच्या टेबलावर कोणी हाय हिलवाली येऊन बसली तर महाशयांची ऑर्डर एक्सप्रेसो (विदाऊट शुगर) शिवाय काय असू शकते?
कॉफी बारमध्ये प्रत्येक स्वभावाच्या माणसासाठी काही ना काही तरी असतं आणि नसेल तरी ऑर्डर प्रमाणे बनवून दिलं जातं, म्हणूनच प्रत्येकाला तिथे एकदातरी जावसं वाटतं. त्यानंतर स्वभावानुसार तो किंवा ती पहिल्या विझिट नंतर पुर्णविराम देतात तर अनेकजण काही ना काही कारणाने तिथल्या वाऱ्या करायला लागतात. शेवटी हे त्यांना आवडणाऱ्या कॉफीवर आणि स्वभावावर अवलंबून आहे. म्हणूनच युवर ऑर्डर डज मॅटर!!!