Saturday, February 11, 2017

'सखाराम बाइंडर' - अंक दुसरा

विजय तेंडुलकर यांची नाटकं म्हणजे नैतिक-अनैतिकतेचा न्यायनिवाडा करण्याच्या भानगडीत न पडता थेट वस्तुस्थिती समोर ठेवण्याचा केलेला प्रयत्न. हे करत असताना नकळत समाजमानसाचा पंचनामा होऊन जातो. ‘सखाराम बाइंडर’ हेदेखिल एकेकाळी असंच समाजमनाला न पटलेलं नाटक. 'गिधाडे', 'घाशीराम कोतवाल' आणि 'सखाराम बाइंडर' याचबरोबर त्यांच्यासारख्या अनेक नाटकांच्या प्रयोगांवर स्वयंघोषित ‘सेन्सॉर’करांनी आघात केला. परंतु, मराठी संस्कृती, समाज आणि एकुणातच नैतिकतेच्या शब्दच्छलाला तोंड देत आजही ही नाटकं चर्चिली जातात आणि कोणी नव्याने रंगभूमीवर सादर करण्याचा प्रयत्न केल्यास त्या प्रयोगांना नाट्यरसिक गर्दीसुध्दा करतात. 'ललित कला केंद्र'चे माजी विद्यार्थी 'सखाराम बाइंडर'चे प्रयोग सध्या करत आहेत. केवळ पाच प्रयोग करणार असल्याने धावतपळतच प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली येथे प्रयोग काल पाहिला.
स्त्री-पुरुष संबंधांतला अस्पर्श कोपरा 'सखाराम बाइंडर' या नाटकात चितारण्यात आला आहे. वांड पुरुषाला कह्य़ात ठेवण्यासाठी स्त्रिया प्रकृतीपरत्वे कुठले मार्ग अवलंबतात, आपल्या पतित आयुष्यातही त्या त्यांच्या परीनं कशी नैतिकता जपतात, हे त्यात दर्शवलं आहे. विजय तेंडुलकरांच्या लेखणीला आजही तोड नाही हे पुन्हा एकदा जाणवलं. मूळ नाटक हे तीन अंकी आहे. परंतु, या प्रयोगमध्ये दुसरा आणि तिसरा अंक एकत्रित करण्यात आलाय. नव्या संचातील हे नाटक जयंत जठार याने बसवलं असून तेंडुलकरांना अपेक्षित आशय प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा पुरेपूर प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे. नाटकाचं नेपथ्य, संगीत, रंगभूषा आणि प्रकाशयोजनाही छान. हिमानी निलेश हिने सौम्य प्रवृत्तीच्या लक्ष्मीचं व्यावहारिक शहाणपण नेमकेपणानं दाखवलंय. सुहास शिरसाट आणि पुंडलिक धुमाळ यांनीही आपल्या भूमिकांना चांगला न्याय दिलाय. पण सर्वात जास्त भाव खाऊन जाते ती 'चंपा' म्हणजेच मुक्ता बर्वे. रंगमंचावरील पहिल्या एन्ट्रीमध्येच ती प्रेक्षकांची मनं जिंकून घेते. चंपाचं तडकभडक व्यक्तिमत्त्व मुक्ता बर्वेनं अचूक पकडलं आहे. त्याच जोरावर ती नाटकाचा दुसरा अंक अक्षरश: खाऊन टाकते. तीचं उभं राहणं, बसणं आणि शब्दफेक या सगळ्यातून तिचा भूतकाळ तुमच्यासमोर स्पष्टपणे उभा राहतो आणि वर्तमानातील बंडखोर वृत्तीची 'चंपा' तुम्हाला आपलंसं करते.
एवढं सगळं चांगलं असताना एक गोष्ट मात्र खटकते आणि ती म्हणजे 'सखाराम'. तो या नाटकाचा नायक आहे, पण दुर्देवाने संदीप पाठक त्या भूमिकेला न्याय देण्यात कमी पडलाय का, असं वाटतं. नाटकाच्या सुरूवातीलाच 'सखाराम'ने स्वत:चीच करून दिलेली ओळख हा या नाटकाचा गाभा आहे. ती वाचताना अंगावर शहारे उभे राहतात. परंतु, सदीप पाठक अगदीच पाठांतर केल्यासारखा बोलतो. त्यामुळे 'सखाराम'चं लिखित जगावेगळं व्यक्तिमत्त्व रंगमंचावर उभंच राहत नाही. आपल्या मर्जीने जगणारा 'सखाराम' तितका आक्रमकपणे दिसत नाही. दिग्दर्शकाने आपली व्हेटो पॉवर येथे वापरणं गरजेचं होतं. कदाचित त्यातला एक भाग असाही असेल की 'सखाराम' म्हणून निळू फुले किंवा सयाजी शिंदे यांचीच प्रतिमा डोळ्यासमोर (निदान माझ्यातरी) उभी राहते आणि त्यामुळेच ही भूमिका नव्या कलाकाराला साकारणं एक आव्हान आहे. पण ते आव्हान पेलताना संदीपची मेहनत कमी पडली असं वाटतं. त्यामुळे पहिला अंक आधीच मवाळ आहे, तो अधिकच मवाळ होतो. नाही म्हणायला दुस-या अंकातील थोडा बुजलेला, पुरूषी अहंकाराला ठेच पोहोचलेला 'सखाराम' त्याने चांगला साकारला आहे. पण दुसरा अंक मुळातच नाट्यपूर्णच असल्याने तेंडुलकरांची लेखणी आणि मुक्ताच्या अभिनयाने अधिक उजवा ठरतो.
नैतिकतेला आव्हान देणा-या या नाटकाला सांप्रत काळी विरोध झाला तो पहिला अंक जास्त रंगला होता. आता दुसरा अंक बिनविरोध पार पडत आहे, हेही नसे थोडके. पण याच धर्तीवर रंगमंचावर सादर झालेल्या प्रयोगाच्या पहिल्या अंकाला मजा आली नाही आणि दुसरा अंक अधिक रंगला आहे (मुक्ताने साकारलेल्या 'चंपा'मुळे). असं असलं तरी बाकी शिल्लक पाहता प्रयत्न स्तुत्य आहे आणि प्रयोगही चांगला रंगतो. शेवटी हे नाटक रंगमंचावर आणण्याचं धाडस करणा-या निर्मात्यांना मनापासून धन्यवाद.
* यशवंत नाट्यमंदीर, माटुंगा येथे आज रात्री ८.३० वाजता नाटकाचा मुंबईतील शेवटचा प्रयोग होत आहे. शक्य असेल तर आवर्जुन पाहा.