Tuesday, September 6, 2011

बोल...


पुरे झालं आता
कंटाळा आला रोज त्याच रडगाण्याचा
एक बोट दुसऱ्याकडे, स्वत:कडे चार
खूप झाली टोलवाटोलवी
न संपणारं चक्र तोडणार कोण?
नको ढकलू उद्यावर
हिम्मत कर...बोल ll1ll

चौकटीबाहेरचं
परंपरेला छेद देणारं
चारचौघात बोललं न जाणारं
मनाला टोचेल असं
न पटणारं, पण शाश्वत सत्य
हिम्मत कर...बोल ll2ll

मोठ्यांना उलटून
कदाचित खोडसाळ
आकलन क्षमतेच्या पलिकडचं
बुध्दीला न पटणारं
बिटविन द टू लाईन्स
हिम्मत कर...बोल ll3ll

क्षणभर दु:खवण्यासाठी
अहंकार तोडण्यासाठी
जूनं दूर सारून
मारून-मुटकून भरलेलं
घातक असं
दूर फेकून देण्यासाठी
हिम्मत कर...बोल ll4ll

















रोज कण कण मरण्यापेक्षा
प्रत्येक क्षण जगण्यासाठी
मध्यांतरातच संपून न जाता
अंतीम पल्ला गाठण्यासाठी
स्वप्नपुर्तीसाठी
हिम्मत कर...बोल ll5ll

आपलेच खोटे ठरतील
मुलखाच्या बाहेर काढतील
कळपाच्या मागे धावू नकोस
वाहवत जाऊ नकोस
हिम्मत कर...बोल ll6ll

आढेवेढे न घेता
स्वत:च्या समाधानासाठी
एक पाऊल पुढे टाकून
नवनिर्मितीच्या ध्यासाने
धीर एकवटून
हिम्मत कर...बोल ll7ll

हिच वेळ आहे बंड करण्याची
घे लहान तोंडी मोठा घास
नव्या पायाभरणीसाठी
उद्याचा नवा सुर्य पाहण्यासाठी
हिम्मत कर...बोल ll8ll