Thursday, September 2, 2010

जल्लोष आणि थरार

बोरिवली

मुंबई जिल्हा काँग्रेस आणि खासदार संजय निरुपम यांच्यातर्फे बोरिवली येथील कोरा केंद्र मैदानात तब्बल ११ लाखांची दहीहंडी बांधण्यात आली होती. सकाळी दहा वाजल्यापासून हजारो प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता संजय निरुपम यांच्या उपस्थितीत कोळसा खाणकाममंत्री प्रकाश जयस्वाल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर तासाभराच्या आतच जवळपास दहा ते बारा पथकांनी सहा-सात थरांचे मानवी मनोरे उभारून उपस्थितांची मने जिंकली. आयोजकांतर्फे सहा थर लावणाऱ्यांना दीड हजार व सात थर लावणाऱ्यांना दोन हजारांचे रोख पारितोषिक व चषक देण्यात आले. खबरदारी म्हणून कुणाला इजा झाल्यास प्रथमोपचारासाठी संपूर्ण दिवस तीन डॉक्टरांच्या साथीने एक रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली आहे. नशीब आजमावयाला विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव येथून दहीहांडी पथकांनी हजेरी लावली होती. उंचच उंच मानवी मनोरे रचताना जोडीला संगीताची साथ देण्यासाठी खास मुंबईचा फेमस डीजे अख्तर याला बोलाविण्यात आले होते. दीड हजारांहून अधिक गाणी वाजविणार असल्याचे त्याने सांगितले. त्यामध्ये मराठी-हिंदी चित्रपट संगीतापासून भांगडा, कोळीगीते आणि जन्माष्टमीच्या विशेष गाण्यांचा समावेश असणार होता. जोगेश्वरी येथील अष्टविनायक मित्रमंडळाच्या तीन वर्षांच्या गणेश रोकडे या चिमुकल्याने सातव्या थरावरून उपस्थितांना सलामी दिली. त्याबाबत त्याची प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला, की मला वर चढायला अजिबात भीती वाटत नाही व ग्रुपमधील सर्व दादा माझी नीट काळजी घेतात. मालाड येथील बालगोपाल मित्रमंडळाचे राजेश धमणे म्हणाले, की आमची मुले ही सात थरांहून मोठय़ा हंडय़ाच फोडतात आणि या वर्षी कमीत कमी अशा दहा हंडय़ा फोडायचा आमचा विचार आहे.

No comments: