Tuesday, December 6, 2011

आम्ही बायकरणी...


नट्टापट्टा, सुगंधी अत्तर, हाय हिल्स, आवडता टॉप आणि जिन्स, शॉर्ट स्कर्ट्स, पंजाबी ड्रेस, बांगड्या, मुलींसारखे नखरे, त्वचा काळी पडेल, खरचटेल, अश्रू गाळणं, नाजूक वागणं यांपैकी कुठल्याच गोष्टींना ते पंधरा दिवस त्यांच्या आयुष्यात थारा नव्हता. रफ अण्ड टफ वागणं, स्वत:चे स्वत: निर्णय घेणं, आपल्याबरोबरच्या इतरांचीही काळजी घेणं आणि आखलेली मोहीम जिद्दिने पुर्ण करणं हा एकच ध्यास घेऊन त्या अकरा बायकरणी निघाल्या होत्या. उर्वशी पाटोळे, फारदोस शेख, केतकी पिंपळखरे, मुग्धा चौधरी, पिंटुली गज्जर, शर्वरी मनकवाड, शीतल बिडये, वर्तिका पांडे, चित्रा प्रिया आणि शरयू या अकरा बायकरणींनी नुकतंच दिल्ली ते खार्दुंगला हे बाराशे किलोमीटरचं अंतर बुलेटवरून यशस्विरित्या पार केलं. १४ ते २९ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या या मोटरबाईक मोहिमेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमीळनाडू, दिल्ली या विविध राज्यांमधून अकरा मुंलींची निवड करण्यात आली होती. अठरा हजार फूट उंचीवर अकरा महिलांनी मोटरबाईक टालवण्याचा आजवरचा हा एक अनोखा विक्रम आहे. मुख्य म्हणजे हि मोहीम कुठलीही स्पर्धा नव्हती तर सर्व बंधनं झुगारून देऊन आजच्या स्त्रिया पुरूषांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत हेच यातून दाखवून देण्याचा प्रयत्न होता.  
लेह-लडाख येथे मोटरबाईक मोहिमेची आखणी करताना भल्याभल्या पुरूषांचीही धांदल उडते, तिथे या महिलांनी अवघ्या सहा महिन्यात त्याची आखणी करून ते कार्य पुर्णत्वाससुध्दा नेलं हि खरंच उल्लेखनीय बाब म्हणता येईल. मुलांप्रमाणेच मुलींनीही मोटरबाईक चालवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात अजून ते ग्लॅमर पातळीवर असून समाजमनावर म्हणावं तसं रूजलेलं नाही. त्यामुळेच रस्त्याने एखादी मुलगी मोटरबाईक चालवताना दिसली तर ती औत्स्युक्याचा विषय ठरते. भारताच्या कानाकोपऱ्यातील अनेक मुलींना बाईक चालविण्याची इच्छा आहे पण परंपरा, संस्कृती आणि समाजातील इतर लोक काय म्हणतील या भितीने त्याला प्रोत्साहन दिलं जात नाही. पण खरंतर मोटरबाईक चालवण्यासारख्या आव्हानात्मक गोष्टी महिलासुध्दा पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून करू लागल्या तरच समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. याच हेतूने पुण्याच्या उर्वशी पाटोळे या अवघ्या तेवीस वर्षीय तरूणीने बायकरणी या भारतातल्या पहिल्या मोटरबाईक ग्रुपची पुण्यात स्थापना केली आहे. बायकरणी हे नावंच मुळात लक्षवेधक आहे. याविषयी उर्वशीला विचारले असता ती म्हणाली, या नावात भारतीयपण आहे. त्याचप्रमाणे उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, शिकलेली-अशिक्षित अशा कोणत्याही विशेष गटाची यात मक्तेदारी न दिसता समस्त महिला वर्गाचं तो नेतृत्व करतो. म्हणूनच आम्ही आमच्या ग्रुपचं नाव बायकरणी ठेवलं. खरंतर गेली सात वर्षे आम्ही लहान-मोठ्या मोहीमांवर जात आहोत पण या वेगळ्या उपक्रमाला संघटनेच्या माध्यमातून बळ मिळावं म्हणून आम्ही जानेवारी २०११ मध्ये रितसर नोंदणी केली. महिलांचं सक्षमीकरण हा आमचा प्रमुख उद्देश आम्हाला प्रत्यक्ष कृतीमधून लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आजवर पंचेचाळीस महिला या ग्रुपच्या सदस्य असून त्यामध्ये चीन आणि इंग्लंड येथील महिलेचांही समावेश आहे. विशेष म्हणजे वुमेन्स इंटरनॅशनल मोटरसायकल असोसिएशन्स (विमा) या संस्थेतर्फे बायकरणी हा ग्रुप जगभरात भारताचं प्रतिनिधीत्वही करत आहे.
 दिल्ली ते खार्दुंगला हा वाहनांसाठीचा जगातील सर्वात उंचावरचा रस्ता आहे, त्यामुळे  मोहिमेसाठी त्याची निवड करण्याचं ठरलं. त्यानंतर सर्वांना ईमेल पाठविण्यात आला. त्यापैकी ज्यांना शक्य आहे आणि सर्वात आधी ज्यांनी संपर्क साधला त्यातून पहिल्या अकरा जणींची निवड करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत आर्थिक प्रश्न महत्वाचा होता. मग प्रायोजक शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली. एवढ्या लांब जायचं त्यामुळे चांगल्या मोटरबाईक्स हव्य़ात म्हणून सर्वात आधी रॉयल एनफिल्डशी संपर्क साधला. त्यांना हि संकल्पना आवडली व त्यांनी दहा बुलेट क्लासिक ५०० देण्याचे मान्य करण्याबरोबरच खाण्यापासून ते इंधनाचा सर्व खर्चही उचलण्याचे ठरवले. आगळावेगळा प्रयत्न, लांबचा प्रवास आणि अगणित आव्हानं त्यामुळे त्याचं व्हिडिओ डॉक्युमेंटेशन व्हावं असं सर्वांना वाटलं, त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. ग्रुपमधील फिरदोस शेख हि मुलगी याआधी युटीव्ही बिंदासच्य़ा स्टंट बाईकिंगच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिने त्यांना संपर्क साधला असता त्यांनी लागलीच याला होकार दिला. युटिव्ही बिंदास चॅनेलनेही प्रायोजक म्हणून मदत आणि त्याचे प्रक्षेपण करण्याचे ठरवले. (२८ ऑक्टोबरपासून पुढील सहा शुक्रवार युटिव्ही बिंधास्त या चॅनलवर ह्या मोहिमाचा अनुभव घेता येईल.) एवढंच नव्हे तर त्यांच्यातर्फे त्यांनी रिव्हर क्रॉसिंग, रॉक क्लाईंबिंग, हनीबी फार्मिंग, रिव्हर राफ्टींग यांसारखे अडव्हेंचर स्पोर्ट्स यामध्ये समाविष्ट केले होते.  
सर्वजणी पहाटे लवकर बाईक चालवायला सुरूवात करायच्या आणि दिवसभर साधारण दहा ते बारा तास बाईक चालवत असत. मध्येच थांबून त्यांचं शूटींग व्हायचं. फोटोसेशन, धमाल आणि खाणं या गोष्टीही सतत चालूच असायच्या. या सर्वजणी पंधरा दिवसात आपल्या बाईकच्या प्रेमात पडल्या होत्या. बाईकबरोबर एक वेगळी नाळ जुळली होती. बाईकवर साधा चिखल उडाला तरी पुसणं, सगळे पार्ट्स व्यवस्थित आहेत याची खातरजमा करणं सतत चालू असायचं.  मोहिमेदरम्यान काहींच्या आरोग्यविषयक तक्रारी होत्या पण त्याचा मोहिमेवर परिणाम झाला नाही. काही जणींना ऑक्सिजनचे मास्कही लावावे लागले पण कुणीही माघार न घेता सर्वांनी  शेवटचा पल्ला गाठला. मुंलींची उंची ही मुंलांच्या तुलनेत कमी असते त्यामुळे आधीच बाईकवर बसताना त्यांना बऱ्याच अडचणी येत असतात. त्यात तर इथे बुलेट होती त्यामुळे खड्ड्यांमधून जाताना खूप कसरत करावी लागे. लहान रस्ते, वेडिवाकडी वळणं, थंडी याचा सामना करावा लागत होता पण कुणीही त्याची तक्रार केली नाही.  
आम्ही सर्वजणी आधीपासूनच आव्हानांसाठी तयार होतो. तिथला निसर्ग छान आहे, त्याची ओढ होतीच. पण अडचणीही लक्षात घेऊन जाण्याआधी भरपूर अनुभवी लोकांशी चर्चा केली. मानसिकदृष्ट्या स्वत:ला तयार  केलं. बाईवर फार सामान न घेता कमीत कमी सामान घ्यायचं ठरवलं. अनेकदा गावात उतरताना लांबून लोकांना कळायचं नाही आम्ही मुली आहेत ते पण आम्ही जेव्हा जवळ जायचो आणि हेल्मेट काढायचो तेव्हा ते आश्चर्यचकित व्हायचे आणि आमचं स्वागत करायचे. विशेषत: महिलांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळायचा. खार्दुंगलाला पोहोचल्यावर आम्ही पुढे नुंब्रा व्हॅलीलासुध्दा गेलो व तिथे एक रात्र घालवली. त्यामुळे खरंतर आमचा प्रवास हा चौदाशे किलोमीटरचा झाला.
एवढ्या महिला पंधरा दिवस एकत्र आणि भांडणं, गॉसिपिंग नाही हे म्हणजे अशक्यच, पण प्रवासादरम्यान असा कुठलाच प्रसंग घडला नाही. मोहिमेवर निघायच्या आधीच ठरवल्यामुळे सर्वांकडे फक्त गोड आठवणींचाच खजिना आहे. आज या अकरा जणींच्या कुटुंबीयांच्या माना अभिमानाने उंचावलेल्या आहेतच पण त्यांना स्वत:ला मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये विशेष स्थान आहे. या यशस्वी मोहिमेनंतर बायकरणीला आता खार्दुंगला ते कन्याकुमारी आणि भारताच्या समुद्रकिनाऱ्यांची मोटरबाईक मोहीम राबविण्याची ओढ लागली आहे.
            

बायकरीणबाई उर्वशी पाटोळे
उर्वशी पाटोळे या अवघ्या तेवीस वर्षीय तरूणीने बायकरणीची स्थापना केली असून, गेली सात वर्ष ती बाईक चालवत आहे. लष्करी पार्श्वभूमी असलेल्या उर्वशीचे वडिल हे सैन्यातील निवृत्त अधिकारी आहेत. तिची आई मिझोरामची असून, शाळेत असताना ती पोलो खेळायची व घोडेस्वारी स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची. उर्वशीची मोठी बहिणसुध्दा पर्वतारोहक असून तिच्यापासून नेहमीच तिला प्रोत्साहन मिळत असतं. साहसी खेळ आणि समोर येईल त्या आव्हानांचा निधड्या छातीने सामना कराण्याचा वारसा घरातल्या मंडळींकडून तिला लहानपणापसूनच मिळाला आहे. उर्वशीने फर्ग्युसन महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केलं असून सध्या ती बॉश या कंपनीत बिझनेस मॅनेजमेंट ट्रेनर म्हणून काम करत आहे. उर्वशीने २०१० साली डर्ट ट्रॅक चॅम्पीयनशीप पटकावली असून महिंद्रासाठी प्रोफेशनल टेस्ट राईडर म्हणून देखिल काम करते. सध्या तिच्याकडे स्वत:च्या रॉयल एनफिल्ड स्टॅंडर्ड ३५०, महिंद्रा स्टॅलिओ आणि बजाज एक्सिड या तीन बाईक्स आहेत.

मुली कुठं आहेत?
लाहोर स्पिती चेकपोस्टवर सर्वजण आपापल्या बुलेटबरोबर थांबले होते, टिममधला एक माणूस पुढे गेला आणि त्याने अधिकाऱ्याला यादी दाखवली. सैन्यातील अधिकाऱ्याने नावाची यादी तपासली आणि विचारले या लिस्टमधील मुली कुठे आहेत? हे ऐकून आधी त्याला हसूच आले, पण नंतर त्याने सर्वांकडे बोट दाखवत म्हटलं या सर्व मुलीच आहेत. मुंलींनी आपापली हेल्मेट काढून चेहरा दाखवल्यावर त्या अधिकाऱ्याला विश्वासच बसेना. तो ते बघून अवाक झाला होता.


पांगचं आदरातिथ्य
पांग येथे एका ढाब्यावर आमचा मुक्काम होता. भरपूर थंडी असल्याने सर्वचजणी गारठून गेल्या होत्या. अंथरूणातूनही बाहेर यावसं वाटत नव्हतं, पण ढाब्याच्या मालकीणीने सर्व मुलींची जातीने काळजी घेतली. सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी, वेळोवेळी चहा, एवढंच नव्हेतर रात्रीचं जेवणही आमच्या बेडवर आमच्या हातात आणून दिलं. 

फक्त एक जागा शिल्लक
या ग्रुपमधली सर्वात लहान सदस्य शर्वरी मनकवाड (२१) हि आपल्या घरच्यांबरोबर सुट्टीनिमित्त सिक्कीमला गेली होती, त्यामुळे तिचा फोन बंद होता. फोन लागत नव्हता म्हणून फिरदोसने तिला मेसेज करून ठेवला होता. शर्वरीने पुणे एअरपोर्टवर उतरल्यावर आपला फोन चालू केला आणि मेसेज मिळाल्यावर लागलीच तिने फिरदोसला फोन केला. फिरदोस म्हणाली, बाईकवरून सर्व मुलींनी लेहला जायचं ठरलंय पण एकच जागा शिल्लक आहे. तुला यायचंय का? लेहला जायचं होतंच पण ती संधी एवढ्या लवकर चालुन येईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता मी हो म्हणाले. माझ्या आयुष्यातील आजवरचा हा सर्वात अविस्मरणीय अनुभव होता, असं ती सांगते.