Saturday, February 11, 2017

'सखाराम बाइंडर' - अंक दुसरा

विजय तेंडुलकर यांची नाटकं म्हणजे नैतिक-अनैतिकतेचा न्यायनिवाडा करण्याच्या भानगडीत न पडता थेट वस्तुस्थिती समोर ठेवण्याचा केलेला प्रयत्न. हे करत असताना नकळत समाजमानसाचा पंचनामा होऊन जातो. ‘सखाराम बाइंडर’ हेदेखिल एकेकाळी असंच समाजमनाला न पटलेलं नाटक. 'गिधाडे', 'घाशीराम कोतवाल' आणि 'सखाराम बाइंडर' याचबरोबर त्यांच्यासारख्या अनेक नाटकांच्या प्रयोगांवर स्वयंघोषित ‘सेन्सॉर’करांनी आघात केला. परंतु, मराठी संस्कृती, समाज आणि एकुणातच नैतिकतेच्या शब्दच्छलाला तोंड देत आजही ही नाटकं चर्चिली जातात आणि कोणी नव्याने रंगभूमीवर सादर करण्याचा प्रयत्न केल्यास त्या प्रयोगांना नाट्यरसिक गर्दीसुध्दा करतात. 'ललित कला केंद्र'चे माजी विद्यार्थी 'सखाराम बाइंडर'चे प्रयोग सध्या करत आहेत. केवळ पाच प्रयोग करणार असल्याने धावतपळतच प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली येथे प्रयोग काल पाहिला.
स्त्री-पुरुष संबंधांतला अस्पर्श कोपरा 'सखाराम बाइंडर' या नाटकात चितारण्यात आला आहे. वांड पुरुषाला कह्य़ात ठेवण्यासाठी स्त्रिया प्रकृतीपरत्वे कुठले मार्ग अवलंबतात, आपल्या पतित आयुष्यातही त्या त्यांच्या परीनं कशी नैतिकता जपतात, हे त्यात दर्शवलं आहे. विजय तेंडुलकरांच्या लेखणीला आजही तोड नाही हे पुन्हा एकदा जाणवलं. मूळ नाटक हे तीन अंकी आहे. परंतु, या प्रयोगमध्ये दुसरा आणि तिसरा अंक एकत्रित करण्यात आलाय. नव्या संचातील हे नाटक जयंत जठार याने बसवलं असून तेंडुलकरांना अपेक्षित आशय प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा पुरेपूर प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे. नाटकाचं नेपथ्य, संगीत, रंगभूषा आणि प्रकाशयोजनाही छान. हिमानी निलेश हिने सौम्य प्रवृत्तीच्या लक्ष्मीचं व्यावहारिक शहाणपण नेमकेपणानं दाखवलंय. सुहास शिरसाट आणि पुंडलिक धुमाळ यांनीही आपल्या भूमिकांना चांगला न्याय दिलाय. पण सर्वात जास्त भाव खाऊन जाते ती 'चंपा' म्हणजेच मुक्ता बर्वे. रंगमंचावरील पहिल्या एन्ट्रीमध्येच ती प्रेक्षकांची मनं जिंकून घेते. चंपाचं तडकभडक व्यक्तिमत्त्व मुक्ता बर्वेनं अचूक पकडलं आहे. त्याच जोरावर ती नाटकाचा दुसरा अंक अक्षरश: खाऊन टाकते. तीचं उभं राहणं, बसणं आणि शब्दफेक या सगळ्यातून तिचा भूतकाळ तुमच्यासमोर स्पष्टपणे उभा राहतो आणि वर्तमानातील बंडखोर वृत्तीची 'चंपा' तुम्हाला आपलंसं करते.
एवढं सगळं चांगलं असताना एक गोष्ट मात्र खटकते आणि ती म्हणजे 'सखाराम'. तो या नाटकाचा नायक आहे, पण दुर्देवाने संदीप पाठक त्या भूमिकेला न्याय देण्यात कमी पडलाय का, असं वाटतं. नाटकाच्या सुरूवातीलाच 'सखाराम'ने स्वत:चीच करून दिलेली ओळख हा या नाटकाचा गाभा आहे. ती वाचताना अंगावर शहारे उभे राहतात. परंतु, सदीप पाठक अगदीच पाठांतर केल्यासारखा बोलतो. त्यामुळे 'सखाराम'चं लिखित जगावेगळं व्यक्तिमत्त्व रंगमंचावर उभंच राहत नाही. आपल्या मर्जीने जगणारा 'सखाराम' तितका आक्रमकपणे दिसत नाही. दिग्दर्शकाने आपली व्हेटो पॉवर येथे वापरणं गरजेचं होतं. कदाचित त्यातला एक भाग असाही असेल की 'सखाराम' म्हणून निळू फुले किंवा सयाजी शिंदे यांचीच प्रतिमा डोळ्यासमोर (निदान माझ्यातरी) उभी राहते आणि त्यामुळेच ही भूमिका नव्या कलाकाराला साकारणं एक आव्हान आहे. पण ते आव्हान पेलताना संदीपची मेहनत कमी पडली असं वाटतं. त्यामुळे पहिला अंक आधीच मवाळ आहे, तो अधिकच मवाळ होतो. नाही म्हणायला दुस-या अंकातील थोडा बुजलेला, पुरूषी अहंकाराला ठेच पोहोचलेला 'सखाराम' त्याने चांगला साकारला आहे. पण दुसरा अंक मुळातच नाट्यपूर्णच असल्याने तेंडुलकरांची लेखणी आणि मुक्ताच्या अभिनयाने अधिक उजवा ठरतो.
नैतिकतेला आव्हान देणा-या या नाटकाला सांप्रत काळी विरोध झाला तो पहिला अंक जास्त रंगला होता. आता दुसरा अंक बिनविरोध पार पडत आहे, हेही नसे थोडके. पण याच धर्तीवर रंगमंचावर सादर झालेल्या प्रयोगाच्या पहिल्या अंकाला मजा आली नाही आणि दुसरा अंक अधिक रंगला आहे (मुक्ताने साकारलेल्या 'चंपा'मुळे). असं असलं तरी बाकी शिल्लक पाहता प्रयत्न स्तुत्य आहे आणि प्रयोगही चांगला रंगतो. शेवटी हे नाटक रंगमंचावर आणण्याचं धाडस करणा-या निर्मात्यांना मनापासून धन्यवाद.
* यशवंत नाट्यमंदीर, माटुंगा येथे आज रात्री ८.३० वाजता नाटकाचा मुंबईतील शेवटचा प्रयोग होत आहे. शक्य असेल तर आवर्जुन पाहा.

Tuesday, January 24, 2017

कॅम्पस MOODY

'लोकसत्ता - कॅम्पस MOOD' ज्यामुळे आमच्या लेखणीला एक नवी ओळख मिळाली. 21 नोव्हेंबर 2006 रोजी सुरू झालेल्या या 'युथफुल' पेजमुळे अनेक तरूण मंडळींचं लिखाण ख-या अर्थाने बहरलं आणि अनेक नवीन मंडळीही लिहीती झाली. कॉलेजविश्वाची आणि तरूणांशी संबंधित प्रत्येक गोष्टीची बित्तंबातमी देणारं हे पहिलं पान.. दर मंळवारी प्रकाशित होणारं. तब्बल सहा वर्षे ते सुरू होतं. या सहा वर्षात मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विविध महाविद्यालतील वेगवेगळ्या आवडीनिवडी, कलागुण असणारे अनेक नवे चेहरे एकत्र आले. त्यांनी कॉलेजविश्व अक्षरशः दणाणून सोडलं. 'कॅम्पस MOOD'मध्ये बातमी येणं हे प्रत्येक महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट असायची. याचं महत्त्वाचं कारण म्हणे 'लोकसत्ता' हे नाव आणि त्यामुळे 'कॅम्पस MOOD' या पानावर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखांचा दर्जा. म्हणूनच की काय मुंबई विद्यापीठाच्या 'युथ फेस्टीवल'च्या रिपोर्टीगसाठी'कॅम्पस MOOD'च्या टीमला गौरवण्यात आलं होतं. अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्यासोबत महाविद्यालयांमध्ये जाऊन मतदान जागृतीसाठी अभियान राबविण्यात आलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसोबत मतदारांचा सर्वे करण्यात आला. 'संयुक्त महाराष्ट्र चळवळी'बाबत लोकांना काय वाटतं याचा धांडोळा घेण्यात आला. या सर्व गोष्टी पहिल्यांदाच तरूणांनी तरूणांसाठी केलेल्या होत्या. याचं फलित म्हणजे 'कॅम्पस'च्या पानावर लिहिणा-या प्रत्येक व्यक्तिला त्यांच्या महाविद्यालयात सेलिब्रिटीचा दर्जा प्राप्त झाला. पण 'कॅम्पस MOOD'चं योगदान इथेच संपत नाही. 'कॅम्पस'मुळेच अनेकांना 'लोकसत्ता'च्या मुख्य अंकात आणि इतर पुरण्यांमध्ये लिखाण करण्याची संधी मिळाली. अनेकांना तर नंतर येथे पूर्णवेळ कामही करता आलं. करियरच्या सुरूवातीला 'लोकसत्ता'सारख्या वर्तमानपत्रामध्ये लिहायला मिळणं याबाबत सुजाण वाचकांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. लिखाणाची संधी एवढंच 'कॅम्पस'चं महत्त्व असं म्हटलं तर ते योग्य होणार नाही. कारण आम्हाला सर्वांना जोडणा-या आणि आजही वेळोवेळी मार्गदर्शन करणा-या महत्त्वाच्या व्यक्तिही आम्हाला येथेच भेटल्या. विनायक परब, प्रसाद रावकर, शेखर देशमुख, प्रशांत पवार, निरज पंडित, निशात सरवणकर आणि तेव्हाचे संपादक कुमार केतकर यांचे आभार मानणं अत्यंत आवश्यक आहॆ. टीम लीडर म्हणून त्यांनी आम्हाला केलेलं मार्गदर्शन, आमच्याकडून करून घेतलेले लिखाण, दिलेल्या संधी, एखाद्या गोष्टीकडे पत्रकार म्हणून बघण्याची दिलेली दृष्टी आजही सर्वांना कामी येत आहे. 'कॅम्पस MOOD' बंद झाल्यापासून त्या त्या बँचचे 'कॅम्पस MOODY' एकमेकांच्या संपर्कात होते पण त्या ज्यांनी ज्यांनी 'कॅम्पस'साठी लिखाण केलं त्या सर्वांनी एकत्र यावं असं गेल्या काही महिन्यांपासून वाटत होतं. त्याप्रमाणे व्हॉट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना एका छत्राखाली एकत्र आणून कालच्या रविवारी भेटणं ठरलं. ब-याच वर्षांना एकमेकांना भेटताना, मधल्या काळात घडलेल्या-बिघडलेल्या गोष्टी ऐकताना, जुन्या आठवणी शेअर करताना धमाल आली. अनेकांनी यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत, समाजात त्यांना वेगळी ओळख प्राप्त झाली आहेत, याचा खूप आनंद आहॆच पण ही मंडळी आपले मित्र-मैत्रिणी आहेत याचा जास्त अभिमान आहे. यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मित्र-मैत्रिणी म्हणून आमची गट्टी आजही भलतीच स्ट्राँग आहॆ. गेल्या काही वर्षात अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मास्टरी मिळवलेली आहे. त्याचा भविष्यात एकमेकांना उपयोग होऊ शकतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ही मैत्री अशीच टिकून राहणं. हा MOOD कायम असाच आनंदी राहावा हीच इच्छा.

Friday, January 13, 2017

गरम दुधाचा ग्लास

सतत घामाच्या धारा लागलेलं शहर काय मस्त गारेगार झालंय. सकाळी लवकर उठायची आणि रात्री उशीरा जागायची पंचाईत झाली आहॆ, इतका गारवा सध्या मुंबईकर अनुभवतायत. गेल्या कित्तेक वर्षात जाणवला नसेल एवढा थंडीचा कडाका जाणवतोय. एरव्ही अंगावरचे कपडे कधी उतरवतोय आणि पंख्याखाली बसतोय या विचारात असणारी तमाम मुंबईची जनता सध्या मफलर आणि स्वेटरमध्ये गुरफटलेली पाहायला मिळतेय. छान आहे, मुंबईची बदलेली हवा खूप सुखावतेय.
नुकताच वांद्रे येथील गेईटी सिनेमागृहातून 'हरामखोर' हा चित्रपट पाहून बाहेर पडलो. एरव्ही गजबजलेली असलेली गेईटीपासून स्टेशनकडे जाणारी आतली एक गल्ली तशी निर्जनच होती. त्यामुळे कदाचित गारवा फारच जाणवत होता.
प्रचंड भूक लागलेली पण घरी जाऊन भोगीच्या स्पेशल भाजीवर आणि भाकरीवर ताव मारायचा असल्याने काहीतरी गरम पेय पिऊन त्यावरच वेळ मारून नेण्याचं ठरवलं. वांद्रे स्टेशनच्या दिशेने चालताना डाव्या हाताला नागौरी काबरा डेअरी हे छोटेखानी हॉटेल दिसलं. बाहेर मोठ्या कढईमध्ये गरम होत असलेल्या दुधाने माझं लक्ष्य हेरलं आणि मी थेट आत शिरलो. भिंतीवर लावलेल्या पदार्थांवर एकदा नजर फिरवली आणि एक ग्लास गरम दुधाची ऑर्डर दिला. त्या पो-याने स्टीलच्या भांड्यामध्ये थोडी साखर टाकली आणि कढईमध्ये गरम होणारं ग्लासभर दूध त्यात ओतलं. साखर नीट वितळेपर्यंत आणि दुधाला चांगला फेस येईपर्यंत तो दूध मिक्स करत होता. त्याने ते एका काचेच्या ग्लासात ओतलं आणि मग एका चमच्याने कढईतल्या दुधावरच्या मलईचा एक चमचा ग्लासात टाकला आणि पुन्हा थोडं फेसाळलेलं दूध त्यावर टाकलं. माझ्यासमोर आलेला तो गरम दुधाचा ग्लास पाहून आधीच माझ्या शरीरात गर्मी आली. प्रत्येक घोटाचा आस्वाद घेत आणि तळाशी गेलेली मलई बोटाने चाखत मी तो फस्त करून हसतमुखाने रू. 24/- काऊंटरवर देऊन तिथून निघालो. 
वांद्रे स्टेशनकडे तलावाच्या बाजूने जाणारा हा रस्ता नेहमीच वाहता असतो, त्यामुळे गर्दीतून वाट काढत जाताना आजुबाजूच्या दुकानांकडे फारसं लक्ष जात नाही. पण आज निवांतपणे चालताना एक शब्द सतत मला खुणावत होता. तो म्हणजे 'नागौरी'. चहा आणि मिल्क सेंटरच्या नावांच्या वर त्याचा आवर्जुन उल्लेख होता. 'नागौरी' हा मुस्लिम समाज मूळचा गुजरात आणि राजस्थान राज्यातील. नागौरी लोहार म्हणूनही ते ओळखले जातात. ते मूळचे राजपूत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, पण कालांतराने काहींनी मुस्लिम धर्म स्विकारला तर काही हिंदूच राहिले. डेअरी फार्मिंग आणि मार्बल टाईल्स हा राजस्थानातील नागौरींचा मुख्य व्यवसाय. साधारणपणे मारवाडी भाषा बोलणारे हे नागौरी बंगळुरू, दिल्ली आणि मुंबईच्या काही भागात वास्तव्य करून आहेत.

Wednesday, January 11, 2017

मोठ्या मनाचा माणूस!


आठ वर्षांपूर्वी जेव्हा ते निवडून आले तो दिवस आणि आजचा दिवस, जगातील सर्वात ताकदवान राष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाली असतानाही आणि त्या पदावरून सन्मानपूर्वक पायउतार होताना चेह-यावर कसलाही अभिनिवेश नाही किंवा आपणच कसे तारणहार होतो याच्या बढाया नाहीत. किती मोठ्या मनाचा माणूस, ज्याला आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपल्या कार्यकाळात कसलाही आरडाओरडा करावा लागला नाही आणि अभिनय तर अजिबातच नाही. म्हणूनच तुम्ही मला चांगला अध्यक्ष आणि माणूस बनवलात ही त्यांनी दिलेली प्रांजळ कबुली तितकीच खरी वाटते.
ओबामा ख-या अर्थाने जागतिक नेते आहेत याचा प्रत्यय पुन्हा एकदा त्यांच्या निरोपाच्या भाषणातून आला. मुलगा, नवरा, बाप, पालक, कायदेतज्ञ, अॅक्टिव्हिस्ट, वक्ता, राजकारणी आणि अध्यक्ष ज्याने बदल (CHANGE) आणि आशा (HOPE) या शब्दांची जगाला नव्याने ओळख करून दिली. जे बोलले तसंच शेवटपर्यंत वागले. आपल्या राजकीय कारकिर्दीचा हिशेब मांडताना त्यांनी कसलीच आकडेवारी दिली नाही, योजनांची जंत्री मांडली नाही, कुणावर आरोप केले नाहीत किंवा आता देशाचे कसे होणार याबाबत चिंता व्यक्त केली नाही. ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्याचा उल्लेखही अत्यंत शांतपणाने. देश म्हणून आपण सतत बदलत राहण्याचं धाडस दाखवलं असं नमूद करताना आता आता देखिल एका अध्यक्षाकडून दुस-याच्या हातात अत्यंत सहजपणे ही जबाबदारी हस्तांतरीत झाली पाहिजे ह्या प्रगल्भ मानसिकतेचं कौतुक करावं तेवढं कमीच. भविष्य हे आपलं असलं पाहिजे आणि हे शक्य आहॆ केवळ लोकशाही व्यवस्थित काम करत असेल तरच, याची जाण ते पुन्हा पुन्हा करून देत होते. सार्वजनिक आरोग्याबाबत आम्ही जे काम केलं त्यापेक्षा इतर कुणी चांगलं करून दाखवलं तर त्याला व्यक्तिश: माझा पूर्ण पाठिंबा असेल, यासाठी खूप मोठं मन लागतं.
विस्थापितांबद्दल आकस बाळगण्यापेक्षा आपल्या विविधतेचं ते एक प्रमुख अंग आहेत, हे त्यांचं विधानदेखिल अनुकरणीयच. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलण्यासाठी अनेक पिढ्या जाव्या लागतात तो संयम बाळगणे आवश्यक आहॆ. राजकारण हे अनेक कल्पनांचं युध्द आहॆ पण आपले संविधान ही आपल्याला मिळालेली अतिशय सुंदर देणगी आहे, तिचा कायम आदर करा आणि ते अग्रस्थानी ठेवण्याचा सल्लाही तितकाच मोलाचा. फक्त निवडणुकीपूर्ती नाही तर आयुष्यभरासाठी लोकशाहीला तुमची गरज आहे, हे कायम स्मरणात ठेवायलाही ते विसरले नाहीत. देशातील प्रत्येक नागरिकाने फक्त मलाच नाही तर या देशाला अभिमान वाटावं अशी कामगिरी केली आहॆ. त्यामुळे या देशाचं भविष्य चांगल्या लोकांच्या हातात असल्याचा विश्वास मला आहे, हा आशावादही त्यांनी दिला. उपराष्ट्राध्यक्षाचा उल्लेख करायला ते विसरले नाहीत.
अध्यक्ष असूनही त्यांनी कधीच 'मी'चा बाऊ केला नाही, मिशेल यांचा उल्लेख आवर्जुन येतच असे. इथेही तो आला आणि तो उल्लेख करताना ते गहिवरलेही. आपल्या पोरींचीही त्यांनी अध्यक्ष म्हणून नाही तर एक अभिमानी बाप म्हणून दखल घेतली. साधारण पाऊण तास चाललेल्या भाषणामध्ये कुठेही किचकट होणे त्यांनी टाळले. अतिशय सोप्या शब्दांमध्ये निरोपाचं भाषण करताना आपण जगातील सर्वात शक्तिशाली पदावरून पायउतार होतोय याची त्यांच्या वागण्या, बोलण्यात किंवा चेह-यावर यत्किंचित खंत दिसत नव्हती. सूर्याने उगवावे आणि आपले काम करून वेळेत परत निघून जावे पुन्हा तितक्याच तेजाने उगवण्यासाठी. बराक हुसैन ओबामा यांची एक्झिटही अशीच म्हणायला हवी. 

Saturday, April 16, 2016

खाऊखुशाल : ताज आईस्क्रीम - सव्वाशे वर्षांची गारेगार परंपरा

घरात एखादा पदार्थ तयार करताना तो पुढच्यावेळी त्याच चवीचा तयार होईल याची आपण खात्री देऊ शकत नाही. परंतु, गेली १२५ वर्षे जर कोणी दररोज त्याच चवीचा पदार्थ तयार करत असेल तर त्याला दाद तर द्यायलाच हवी पण त्यांच्या सातत्याचं कौतुकही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या तापमानाचा पारा वेगवेगळे विक्रम प्रस्थापित करतोय. तेव्हा तुम्ही उन्हात फिरत असताना सतत काहीतरी थंड पदार्थ खाण्याची किंवा पिण्याची गरज वाटते. अशावेळी तुम्ही बोहरी मोहल्ला परिसरात असाल तर थोडी वाट वाकडी करून 'ताज आईस्क्रीम'ला जरूर भेट देऊन अतिशय माफक दरात तिथल्या ताज्या फळांच्या आईस्क्रीमचा आस्वाद लुटू शकता. कुटुंबाचा पूर्वापार चालत आलेला हा व्यवसाय सध्या हातिमभाई तितक्याच आपुलकीने आणि तडफेने करत आहेत. गेल्या सव्वाशे वर्षांमध्ये आईस्क्रीम तयार करण्याच्या पद्धतीत आजवर कोणताच फरक पडलेला नाही हे विशेष.

बाजारात जी ताजी फळं उपलब्ध आहेत त्याच फळांचं आईस्क्रीम येथे तयार केलं जातं. आज त्यांच्याकडे हापूस आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी, केसर पिस्ता, पेरू, टेंडर कोकोनट, चोको चिप्स हे फ्लेवर्स मिळतात. त्याचप्रमाणे पान पसंद, मोसंबी, संत्र, किलगड, मस्कमेलन हे फ्लेवर्स ऑर्डरप्रमाणे तयार केले जातात. आंबा आईस्क्रीमसाठी केवळ हापूस आंब्याचाच वापर केला जातो आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर्ससाठी स्ट्रॉबेरी थेट महाबळेश्वरहून मागवल्या जातात. टेंडर कोकोनट म्हणजे शहाळ्याच्या आईस्क्रीमसाठी केवळ जाड मलई वापरली जाते आणि त्यात श्रीलंकन कोकोनट पावडरचा वापर करण्यात येतो. मुख्य म्हणजे आइस्क्रीम तयार करण्यासाठी पूर्ण सायीच्या ताज्या दुधाचाच वापर केला जातो. म्हणूनच की काय प्रत्येक घास स्वर्गसुखाची अनुभूती देतो आणि फळांचे फ्लेवर्स केवळ नावापुरते राहत नाहीत.

येथे आईस्क्रीम लिटरने नाही तर किलोने विकलं जातं. सर्व फ्लेवर्सची एकच किंमत असून कपमध्ये ६० रुपयांना १०० ग्रॅम आईस्क्रीम दिलं जातं. ४०० ते ६०० रुपये असा किलोचा भाव आहे. एखादा फ्लेवर संपला तर मागणीनुसार तो ३० मिनिटांमध्ये तयार केला जातो. इतके येथील कामगार सरावलेले आहेत. हातिमभाई म्हणाले आम्ही सरसकट कुठल्याही कॅटर्सला आईस्क्रीम विकत नाही. जे चांगली किंमत मोजायला तयार असतील आणि ज्यांना चांगल्या प्रतीचं आइस्क्रीम खायचं आहे त्यांनाच आम्ही आइस्क्रीम विकतो. दादर, कुलाबा, माझगांव, भायखळा अशा आठ ते दहा किलोमीटर घरपोच सुविधाही दिली जाते.

शहरातील एका कोपऱ्यात इतकी र्वष यशस्वीपणे चांगल्या दर्जाच्या पदार्थाचा आस्वाद देणाऱ्या पहिल्या पाच जागांमध्ये ताज आईस्क्रीमचा समावेश होतो, असंही हातिमभाई यांनी सांगितलं. म्हणूनच की काय, झोमॅटो या पदार्थाना रेटिंग देणाऱ्या संकेतस्थळाने ताज आईस्क्रीमला चक्क पाचपकी ४.९ स्टार दिले आहेत. शहरातील अनेक टूर्स कंपन्या मुंबईतील महत्त्वाच्या जुन्या जागा आणि प्रसिद्ध पदार्थाची माहिती देताना आपल्या खास परदेशी पाहुण्यांना आईस्क्रीमची चव चाखण्यासाठी ताज आईस्क्रीमला घेऊन जातात. ज्याप्रमाणे हातिमभाईंचा हा कौटुंबिक व्यवसाय आहे, त्याप्रमाणे त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांचीसुद्धा ही दुसरी पिढी आहे. त्यांचीसुद्धा ते तितकीच काळजी घेतात. त्या प्रेमाची चवसुद्धा बहुदा या आईस्क्रीममध्ये उतरते. त्या पद्धतीसोबत त्याचं आणखीही एक गुपित आहे. चवीचं आणखी एक गुपित म्हणजे, बेल्जियम क्वालिटीच्या तांब्याच्या भांडय़ामध्ये येथे आईस्क्रीम तयार करण्यात येतं. एवढंच नाही तर हातिमभाईंचं कुटुंब गेली कित्येक वर्षे या भांडय़ांची खरेदी मोहम्मद अली रोडवरील फैझुल्लाभाई तांबावाला आणि एच.ए.तांबावाला यांच्याकडूनच करतात.

एकावेळी वीस लोकं बसून आईस्क्रीमचा आनंद लुटू शकतील, अशी टेबल-खुच्र्याची रचना करण्यात आलेली आहे. आईस्क्रीमसोबत आता कुल्फी रोलसुद्धा येथे मिळतात. ऑर्डर दिल्यानंतर कुठल्याही विलंबाशिवाय अतिशय प्रेमाने हातिमभाई आलेल्या ग्राहकांना आईस्क्रीम खाऊ घालतात. म्हणूनच हातिमभाई म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही मनापासून एखादा व्यवसाय केलात तर केवळ तो व्यवसाय करणारी माणसं म्हातारी होतात, पण तो व्यवसाय मात्र तरुणच राहतो. ताज आईस्क्रीमच्या कुठल्याही फ्लेवर्सची चव चाखताना हे आवर्जून ध्यानात येतं.

आईस्क्रीम तयार करण्याची पद्धत
सर्वात प्रथम दररोज जवळपास ८० ते १०० लिटर दूध मोठय़ा भांडय़ामध्ये एकत्र तापवलं जातं. चांगलं उकळलेलं दूध पूर्णपणे थंड केलं जातं. त्यानंतर त्यामध्ये दुधाच्या व साखरेच्या ठरलेल्या प्रमाणाप्रमाणे साखर टाकली जाते. साखर नीट विरघळल्यानंतर ते दूध फ्रीजमध्ये ठेवण्यात येतं. आणि त्यानंतर ते गरजेप्रमाणे बाहेर काढून वापरलं जातं. पुढील प्रक्रिया करण्यासाठी सर्व ताजी फळे वापरण्यात येतात. त्यांचा गर काढून तो व्यवस्थित क्रश केला जातो. स्ट्रॉबेरी, अननस या फळांना थोडं शिजवलंही जातं. दूध, फळांचा क्रश आणि आवश्यक इतर साहित्याचे सुयोग्य मिश्रण करून आईस्क्रीम तयार करण्यात येते.

* पत्ता : ताज आईस्क्रीम : खारा टँक रोड, बोहरी मोहल्ला, भेंडी बाजार, भायखळा 
* वेळ – स. १० ते रात्री १२ वाजेपर्यंत.

हा लेख लोकसत्ता संकेतस्थळावर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Sunday, November 16, 2014

'एलिझाबेथ एकादशी' : 'टीकाऊ'पणाचं अफलातून लॉजिक

'एलिझाबेथ एकादशी' हा परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट, तो पाहण्याआधी आणि पाहिल्यानंतर स्व:कडे आकर्षित करण्याच्या साध्या ग्रँव्हिटीच्या नियमामध्ये कमालीचा चपखल बसतो. खुद्द पंढपुरात फक्त चार दिवसांमध्ये घडणारी एक सरळ साधी गोष्ट. पण ती मांडताना दिग्दर्शकाने केलेले आजच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि बौध्दीक व्यवस्थेचे चित्रण केवळ लाजवाबच म्हणता येईल.
रूप-रंग, श्रीमंती, व्यवसाय या सर्वच पातळीवर आबाळं असलेला परंतु तरीही देव म्हणवला गेलेला असा विठ्ठल हा सामांन्याचे श्रध्दास्थान. तीच बाब सायकलची. त्यामुळे या दोघांना केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. प्रेक्षकांना मुर्ख न समजता त्यांच्या विचारक्षमतेला आव्हान देत, संवेदनशीलतेचा ठाव घेत आणि निखळ मनोरंजन करतानाही आजच्या सामाजिक प्रश्नांची मांडणी करत हा चित्रपट सुरू होतो आणि संपतो. परंतु, विशेष म्हणजे चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावरही विचार करायला भाग पाडत राहतो.
पंढरपूर आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने येणारा उत्सव, लोकांची श्रध्दा, संत साहित्य, परंपरा, तेथील जनजीवन, राहणीमान, लोकांचे स्वभाव ह्या सर्व गोष्ठी चित्रपटात आहेतच. पण त्याचबरोबरीने शिक्षण (शिष्यवृत्ती परीक्षा), विज्ञान (न्यूटनला देव्हा-यात स्थान ), सरकारी कायदे , सेक्सच्या (उत्सवाच्या काळात चालणारा वेश्याव्यवसाय) पातळीवर टँबू मानल्या गेलेल्या गोष्टी दिग्दर्शकाने इतक्या सहजसुंदरपणे यामध्ये गुंफल्या आहेत त्याला तोड नाही. त्यामध्येही वैचारिक खाद्याची आस असलेल्यांना ते आणि केवळ मनोरंजन हवं असणा-यांना ते या चित्रपटातून एकाच वेळी पुरेपूर मिळतं हे विशेष.
आई-मुलं, सासू -सून आणि आजी-नातवंड यांच्यातील नातं खूप गोड पध्दतीनं यामध्ये दाखवण्यात आलंय. मुलांचे स्वभाव आणि मैत्री दाखवताना त्यामधील सहजता जपण्यात आली आहे. नवरा गेल्यावर स्वेटर तयार करून, जेवणं बनवून मुलांच्या शिक्षणासाठी चाललेली आईची दगदग, बँकेचे कर्ज फेडण्यासाठी पाच हजार जमवण्यासाठी चाललेली धडपड, घराच्या मालकिणीचा व्यवहारीपणा आणि चांगुलपणा, गावातील आणि गावाबाहेरून आलेल्या व्यक्तींच्या स्वभावातले बारकावे दिग्दर्शकाने इतक्या सहजपणे पकडले आहेत की ती मंडळी पडद्यावर अभिनय करतायत असे वाटतंच नाही.
चित्रपटातील संवाद ही सर्वात जमेची बाजू. ते लहान मुलांच्या तोंडी देतानाही उपदेशपर वाटणार नाहीत आणि त्यांनी केलेले विनोद सर्व वयोगटातील लोकांना आपलेसे वाटतील याची खबरदारी घेण्यात आली आहे. किर्तनांचा आणि गोष्टींचा केलेला वापर जबरदस्त. या चित्रपटातील एकमेव गाणं हे श्रवणीय तर आहेच पण त्याहीपलिकडे त्या गाण्यातून आजच्या समाजजीवनावर केलेलं टोकेरी भाष्य अफलातूनच म्हणावं लागेल. इग्लंडची राणी एलिझाबेथ ही बराच काळ टिकली. त्यामुळे 'एलिझाबेथ' म्हणजे 'टीकाऊ' आणि म्हणूनच सायकलचं नाव एलिझाबेथ. हे 'टीकाऊ'पणाचं लॉजिक अनेकअर्थांनी या सिनेमालाही तंतोतंत लागू पडतं.
चित्रपटाची कथा कशी पुढे सरकते हे पडद्यावर बघण्यात आणि संवाद पात्रांच्या तोंडून ऐकण्यात मजा आहे. त्यामुळे ते देण्याचा मोह मी टाळला आहे

Sunday, November 2, 2014

कविता : जगणे...!

तळणे, मळणे, उकडणे
झटपट संपवून टाकणे

शिजवणे, भिजवणे, परतवणे
तात्पुरती काळजी मिटवणे

वाळवणे, मुरवणे, सुकवणे
भविष्याची तरतूद करणे

कुटणे, भरडणे, वाटणे
तोंडी लावायला करणे

गाळणे, तापवणे, उकळवणे
स्वच्छतेसाठी झगडणे

कुस्करणे, चेचणे, दाबणे
अस्तित्व मिटवून टाकणे

गिळणे, चघळणे, चावणे
तजवीज करणे

मारणे, सोडणे, टाकणे
मोकळे होणे

खाणे, पिणे, श्वासोच्छवास करणे
जिवंत असणे

व्यक्त होणे, लढणे, झगडणे
जगणे...!