Thursday, February 3, 2011

‘सवाई’ची मानकरी ‘गिरगाव व्हाया दादर’!


 वर्षभरातील एकांकिका स्पर्धांची फायनल आणि सर्वौत्तम एकांकिकांची मेजवानी म्हणजे चतुरंगची सवाई एकांकिका स्पर्धा. गेल्या 23 वर्षांपासून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला प्रारंभ होऊन प्रात:काली राष्ट्राला संपूर्ण वंदे मातरमने वंदन करून पारितोषिक वितरणाने संपन्न होणारी मुंबईतील, महाराष्ट्रातील, देशातील नव्हे तर (कदाचित) संपूर्ण जगातील सवाई ही एकमेव एकांकिका स्पर्धा असावी. एकूण 27 प्रथम पारितोषिक विजेत्यांमधून निवडल्या गेलेल्या सात एकांकिकांची अंतीम फेरी परवा मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात पार पडली. दरवर्षी नेमाने नाट्य जागरण करणाऱ्या नाट्यप्रेमींनी यावर्षीही उत्स्फुर्त प्रतिसाह देत तासाभरातच तिकीटबारीवर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकावला होता. या 24 व्या नाट्यजागरणाचा घेतलेला हा आढावा.
 
-----------------------------------

त्यांचा परफॉरमन्स झाला आणि नाट्यगृहात एकच चर्चा सुरू झाली, की आता दुसऱ्या क्रमांकाचा दावेदार कोण? अनेकांनी तर प्रेक्षक पसंतीसाठी दिलेल्या पत्रिकेतील चार हा आकडा पण फाडून बाजूला ठेवल्याचं ऐकू येत होतं. कोण म्हणतं देणार नाय...घेतल्या शिवाय जाणार नाय... या घोषणा खऱ्या ठरवत परिक्षकांनी निकाल जाहीर करण्याअगोदरच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला आणि व्हाया आयएनटी, मृगजळ असा प्रवास करत एम.डी. कॉलेजची गिरगांव व्हाया दादरही एकांकिका चोविसाव्या सवाई एकांकिका स्पर्धेत सवाई एकांकिका ठरली. महाराष्ट्र राज्य हे 2010-2011 वर्ष आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करीत आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी तरूण, बायका, म्हातारी मंडळी ते शाळेत जाणाऱ्या पोरांपासून सर्वांनीच यात सहभाग घेतला होता. परदेशी शक्तीपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर आपल्याच देशातील लोकांबरोबर लढताना 105 हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा लढा कसा दिला गेला, ते दिवस कसे होते याचं चित्रण गिरगांव व्हाया दादर या एकांकीकेत करण्यात आलं आहे. दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांनी आपली कामगिरी चोख बजावली असली तरी लेखनात ही एकांकिका कमी पडते. पण पन्नासहून अधिक कलाकारांच्या साथीने उत्कृष्ट प्रकाशयोजना आणि प्रसंगानुरूप अतिशय कल्पक नेपथ्याव्दारे व्दारे हा सारा लढा स्टेजवर पाहताना आपणही त्या काळात गेल्यावाचून राहत नाही. भूषण देसाई (सवाई प्रकाशयोजनाकार), सचिन गावकर ( सवाई नेपथ्य), अमोत भोर ( सवाई दिग्दर्शक) आणि प्रेक्षक पसंती ही पारितोषिके पटकावत सवाईमध्येही आपली घौडदौड कायम ठेवली. गिरवाव व्हाया दादरच्या जोडीने अनेक स्पर्धा गाजणाऱ्या व मृगजळमध्येही दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेल्या मुंबई विद्यापीठाच्या एक दोन अडीचया एकांकीकेला सवाईकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण त्यांना इथेही व्दितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. थिअरी ऑफ रीलेटीविटीवर आधारीत ही एकांकिका फक्त दोनच पात्रांची होती. आयुष्यात कोणत्याही घटना या योगायोगाने होत नसून घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा एकमेकांशी काही ना काही तरी संबंध असतो. जीवनात खचून न जाता समोर आलेल्या प्रत्येक अडचणींवर सकारात्मकपणे व शांतपणे विचार केला तर कुठल्याही कठीण प्रसंगातून सहजपणे मार्ग काढता येतो, हे निनाद लिमये व सुनिल तांबट या दोघांनी त्यांच्या दमदार परफॉरमन्सव्दारे दाखवून देऊन ते प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले होतेच, पण निनाद लिमये हा तर सवाई अभिनेत्याचा दावेदार मानला जात होता. पण एकांकिका व्दितीय व सुनिल तांबट (सवाई लेखक) ही पारितोषिकं पटकावत थोडा लांबलेला परफॉरसऩ्स, संगीत आणि प्रकाशाच्या अभावामुळे ही एकांकिका पिछाडीवर पडली. 
सर्वच आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतीम फेरीत हसखास आढळणारं, दमदार परफॉरमन्स देणारं व हमखास पारितोषिकं पटकावणारं कॉलेज म्हणजे डी.जी.रूपारेल कॉलेज. वेगळे विषय आणि तेवढीच वेगळ्या पध्दतीची मांडणी म्हणूच रूपारेलने नेहमीच आपली छाप पाडली आहे. यावर्षीची “18 Till I die” ही देखील तशाच वेगळ्या धाटणीची होती. सोशल नेटवर्कींगच्या जमान्यात फेसबुकवर टाकलेले स्टेटस् खरंच रीयल असतात का? त्यावर टाकलेल्या स्टेटसव्दारे खरंच आपल्याला काय म्हणायचंय, आपल्या मनातील भावना या लोकांपर्यंत पोहचत असतात का? तसेच दिसण्यावरच सर्व गोष्टी अवलंबून असतात की आपला स्वभाव आणि भावनांना अधिक महत्व असतं याचं उत्कृष्ट चित्रण या एकांकीकेत होतं. तुषार घोडीगावकरने साकारलेला नीरज तर सर्वांना आवडून गेलाच पण समृध्दी घुमरेच्या संयत अभिनयाने तिला सवाई अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवून दिला. याच एकांकीकेच्यावेळी पुढच्या सीनची उत्कंठा वाढवणारा सीन संपल्यावर शेवटच्या सिनच्या आधी अचानक लाईट ट्रॅप झाले आणि परफॉरमन्स थांबला. काय झालं? अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये चालू होताच लाईट ट्रॅप झाल्याचं जाहीर करण्यात आलं आणि चोख परफॉरमन्सला इथे खंड पडला. पण मग प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिलं आणि मिनिट भरातच पुढचा सीन सुरू झाला.

एकांकिका संपली की गरम चहा आणि कॉफीचे घोट घेत सिगरेटचे झुरके मारत चर्चा रंगत होत्या. रात्र जशी वाढत होती तशी डोळ्यावर झोपेची झापडंही चढत होती. पण खरी झोप उडवली ते मुंबईच्या ठाकूर महाविद्यालय, विज्ञान आणि वाणिज्य या कॉलेजच्या पडद्याआड हया एकांकीकेने. ही एकांकिका म्हणजे नव्या दमाच्या कलाकारांची खास मेजवीनी होती. एकांकीकेतील हेमा (वैभवी आंबोळकर), जया (सुवेधा देसाई) आणि बुवा (गौरव मोरे) या पात्रांची एनर्जी तोंडात बोटे घालायला लावणारी होती. समाजात माणसांमध्ये जातीवरून अजूनही भेदभाव केला जात असताना समाजाचं प्रतिबिंब, समस्या ज्या रंगभूमीच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडल्या जातात तिथेही प्रमुख कलाकार व बॅकस्टेज आर्टीस्ट हा भेदभाव कसा केला जातो हे अतिशय नेमक्याच नेपथ्याचा योग्य वापर करून विनोदी पध्दतीने मांडण्यात आलं होतं. कुठल्याच बाबतीत फारसा दम नसलेली ही एकांकिका हाय एनर्जी परफॉमन्स आणि काही चांगल्या व पीजे छाप विनोदांनी सर्वांचं मनोरंजन मात्र करून गेली. लवबर्ड्स, वि.वा.ट्रस्ट, विरार या एकांकीकेत तारूण्याच्या उंबरठ्यावर असताना सतत मनाची कशी घालमेल होत असते हे दाखवण्यात आलं होतं. प्रेम म्हणजे नक्की काय? मनानं एकमेकांच्या जवळ असणं की शरीरांनं? याचा उलगडा होत नसतो. मित्रांचं ऐकायचं, की आपल्या मनाला जे योग्य वाटतंय ते करायचं या दोलायमान स्थितित मन असतं.  आपण शरीराने जवळ आलो तरच आपल्यातलं नातं अधिक घट्ट होईल अशा स्वभआवाचा तो आणि आपली इच्छा नसतानासुध्दा जर तु हे केलंस तर आपण शरीराने तर जवळ येऊ पण मनाने नाही हे समजावणारी ती या एकांकीकेत होते. लेखनातून बाहेर आलेले काही मजेदार प्रसंग सोडले तर या एकांकीकेत नवीन असं काहीच नव्हतं. अशीच आणखी एक एकांकिका म्हणजे झुंपा लाहिरी यांच्या कथेवर आधारलेली पर्णिका संस्था, मुंबईची दि लास्ट डीनर. जुना विषय आणि ठिसाळ मांडणी यामुळे एकांकीकेतील अनेक कच्चे दुवे समोर येत होते. लाऊड म्युझीक आणि वाईट प्रकाशयोजना यामुळे ही एकांकिका फार रंगलीच नाही.

एम.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुण्याच्या “HTTP 404: Page Not Found” ने मात्र तगडा परफॉरमन्स देत क्रमांकासाठीची दावेदारी कायम ठेवली होती. थोड्या वेगळ्या आणि थेट तरूणांशी निगडीत विषयावर भाष्य करणारी ही एकांकिका होती. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलं आणि पालक यांच्या नात्यात झालेला बदल आणि त्याला चांगल्या-वाईट या दोन्ही अर्थांनी मिळालेली इंटरनेटची (पर्यायाने सोशल नेटवर्कींग साईटची) साथ कशाप्रकारे खऱ्या नात्यांतला गोडवा नष्ट करून व्हर्च्युअल रीएलीटीमध्ये जगण्यात कसा आनंद देत आहे हे मांडण्यात आलं होतं. लेखनात चांगली उतरलेल्या ह्या एकांकीकेने शेवटचा दमदार परफॉरमऩ्स देत स्पर्धेतील निकालातील उत्कंठा कायम ठेवण्यात भरपूर मदत केली. या एकांकीकेतील प्रमुख भूमिका करणाऱ्या आरोह वेलणकरने अपक्षेप्रमाणे सवाई अभिनेत्याच्या ट्रॉफीवर नाव कोरलं तर सवाई ध्वनीसंयोजनाचं पारितोषिक रोहित वेखंडे यानं पटकावलं.
एकंदरीत यावर्षीच्या स्पर्धेत तरूणांचे प्रश्न मांडणाऱ्या, तरूणांना ज्या प्रश्नांबद्दल आपुलकी आहे अशा विषयांच्या एकांकिका पहायला मिळाल्या. अंतीम फेरीचे परिक्षक म्हणून अभिनेते सदाशिव अमरापूरकर, संगीत कुलकर्णी आणि नाट्य लेखक आनंद म्हसवेकर यांनी काम पाहिले.  

No comments: