Tuesday, December 6, 2011

आम्ही बायकरणी...


नट्टापट्टा, सुगंधी अत्तर, हाय हिल्स, आवडता टॉप आणि जिन्स, शॉर्ट स्कर्ट्स, पंजाबी ड्रेस, बांगड्या, मुलींसारखे नखरे, त्वचा काळी पडेल, खरचटेल, अश्रू गाळणं, नाजूक वागणं यांपैकी कुठल्याच गोष्टींना ते पंधरा दिवस त्यांच्या आयुष्यात थारा नव्हता. रफ अण्ड टफ वागणं, स्वत:चे स्वत: निर्णय घेणं, आपल्याबरोबरच्या इतरांचीही काळजी घेणं आणि आखलेली मोहीम जिद्दिने पुर्ण करणं हा एकच ध्यास घेऊन त्या अकरा बायकरणी निघाल्या होत्या. उर्वशी पाटोळे, फारदोस शेख, केतकी पिंपळखरे, मुग्धा चौधरी, पिंटुली गज्जर, शर्वरी मनकवाड, शीतल बिडये, वर्तिका पांडे, चित्रा प्रिया आणि शरयू या अकरा बायकरणींनी नुकतंच दिल्ली ते खार्दुंगला हे बाराशे किलोमीटरचं अंतर बुलेटवरून यशस्विरित्या पार केलं. १४ ते २९ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या या मोटरबाईक मोहिमेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमीळनाडू, दिल्ली या विविध राज्यांमधून अकरा मुंलींची निवड करण्यात आली होती. अठरा हजार फूट उंचीवर अकरा महिलांनी मोटरबाईक टालवण्याचा आजवरचा हा एक अनोखा विक्रम आहे. मुख्य म्हणजे हि मोहीम कुठलीही स्पर्धा नव्हती तर सर्व बंधनं झुगारून देऊन आजच्या स्त्रिया पुरूषांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत हेच यातून दाखवून देण्याचा प्रयत्न होता.  
लेह-लडाख येथे मोटरबाईक मोहिमेची आखणी करताना भल्याभल्या पुरूषांचीही धांदल उडते, तिथे या महिलांनी अवघ्या सहा महिन्यात त्याची आखणी करून ते कार्य पुर्णत्वाससुध्दा नेलं हि खरंच उल्लेखनीय बाब म्हणता येईल. मुलांप्रमाणेच मुलींनीही मोटरबाईक चालवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात अजून ते ग्लॅमर पातळीवर असून समाजमनावर म्हणावं तसं रूजलेलं नाही. त्यामुळेच रस्त्याने एखादी मुलगी मोटरबाईक चालवताना दिसली तर ती औत्स्युक्याचा विषय ठरते. भारताच्या कानाकोपऱ्यातील अनेक मुलींना बाईक चालविण्याची इच्छा आहे पण परंपरा, संस्कृती आणि समाजातील इतर लोक काय म्हणतील या भितीने त्याला प्रोत्साहन दिलं जात नाही. पण खरंतर मोटरबाईक चालवण्यासारख्या आव्हानात्मक गोष्टी महिलासुध्दा पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून करू लागल्या तरच समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. याच हेतूने पुण्याच्या उर्वशी पाटोळे या अवघ्या तेवीस वर्षीय तरूणीने बायकरणी या भारतातल्या पहिल्या मोटरबाईक ग्रुपची पुण्यात स्थापना केली आहे. बायकरणी हे नावंच मुळात लक्षवेधक आहे. याविषयी उर्वशीला विचारले असता ती म्हणाली, या नावात भारतीयपण आहे. त्याचप्रमाणे उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, शिकलेली-अशिक्षित अशा कोणत्याही विशेष गटाची यात मक्तेदारी न दिसता समस्त महिला वर्गाचं तो नेतृत्व करतो. म्हणूनच आम्ही आमच्या ग्रुपचं नाव बायकरणी ठेवलं. खरंतर गेली सात वर्षे आम्ही लहान-मोठ्या मोहीमांवर जात आहोत पण या वेगळ्या उपक्रमाला संघटनेच्या माध्यमातून बळ मिळावं म्हणून आम्ही जानेवारी २०११ मध्ये रितसर नोंदणी केली. महिलांचं सक्षमीकरण हा आमचा प्रमुख उद्देश आम्हाला प्रत्यक्ष कृतीमधून लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आजवर पंचेचाळीस महिला या ग्रुपच्या सदस्य असून त्यामध्ये चीन आणि इंग्लंड येथील महिलेचांही समावेश आहे. विशेष म्हणजे वुमेन्स इंटरनॅशनल मोटरसायकल असोसिएशन्स (विमा) या संस्थेतर्फे बायकरणी हा ग्रुप जगभरात भारताचं प्रतिनिधीत्वही करत आहे.
 दिल्ली ते खार्दुंगला हा वाहनांसाठीचा जगातील सर्वात उंचावरचा रस्ता आहे, त्यामुळे  मोहिमेसाठी त्याची निवड करण्याचं ठरलं. त्यानंतर सर्वांना ईमेल पाठविण्यात आला. त्यापैकी ज्यांना शक्य आहे आणि सर्वात आधी ज्यांनी संपर्क साधला त्यातून पहिल्या अकरा जणींची निवड करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत आर्थिक प्रश्न महत्वाचा होता. मग प्रायोजक शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली. एवढ्या लांब जायचं त्यामुळे चांगल्या मोटरबाईक्स हव्य़ात म्हणून सर्वात आधी रॉयल एनफिल्डशी संपर्क साधला. त्यांना हि संकल्पना आवडली व त्यांनी दहा बुलेट क्लासिक ५०० देण्याचे मान्य करण्याबरोबरच खाण्यापासून ते इंधनाचा सर्व खर्चही उचलण्याचे ठरवले. आगळावेगळा प्रयत्न, लांबचा प्रवास आणि अगणित आव्हानं त्यामुळे त्याचं व्हिडिओ डॉक्युमेंटेशन व्हावं असं सर्वांना वाटलं, त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. ग्रुपमधील फिरदोस शेख हि मुलगी याआधी युटीव्ही बिंदासच्य़ा स्टंट बाईकिंगच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिने त्यांना संपर्क साधला असता त्यांनी लागलीच याला होकार दिला. युटिव्ही बिंदास चॅनेलनेही प्रायोजक म्हणून मदत आणि त्याचे प्रक्षेपण करण्याचे ठरवले. (२८ ऑक्टोबरपासून पुढील सहा शुक्रवार युटिव्ही बिंधास्त या चॅनलवर ह्या मोहिमाचा अनुभव घेता येईल.) एवढंच नव्हे तर त्यांच्यातर्फे त्यांनी रिव्हर क्रॉसिंग, रॉक क्लाईंबिंग, हनीबी फार्मिंग, रिव्हर राफ्टींग यांसारखे अडव्हेंचर स्पोर्ट्स यामध्ये समाविष्ट केले होते.  
सर्वजणी पहाटे लवकर बाईक चालवायला सुरूवात करायच्या आणि दिवसभर साधारण दहा ते बारा तास बाईक चालवत असत. मध्येच थांबून त्यांचं शूटींग व्हायचं. फोटोसेशन, धमाल आणि खाणं या गोष्टीही सतत चालूच असायच्या. या सर्वजणी पंधरा दिवसात आपल्या बाईकच्या प्रेमात पडल्या होत्या. बाईकबरोबर एक वेगळी नाळ जुळली होती. बाईकवर साधा चिखल उडाला तरी पुसणं, सगळे पार्ट्स व्यवस्थित आहेत याची खातरजमा करणं सतत चालू असायचं.  मोहिमेदरम्यान काहींच्या आरोग्यविषयक तक्रारी होत्या पण त्याचा मोहिमेवर परिणाम झाला नाही. काही जणींना ऑक्सिजनचे मास्कही लावावे लागले पण कुणीही माघार न घेता सर्वांनी  शेवटचा पल्ला गाठला. मुंलींची उंची ही मुंलांच्या तुलनेत कमी असते त्यामुळे आधीच बाईकवर बसताना त्यांना बऱ्याच अडचणी येत असतात. त्यात तर इथे बुलेट होती त्यामुळे खड्ड्यांमधून जाताना खूप कसरत करावी लागे. लहान रस्ते, वेडिवाकडी वळणं, थंडी याचा सामना करावा लागत होता पण कुणीही त्याची तक्रार केली नाही.  
आम्ही सर्वजणी आधीपासूनच आव्हानांसाठी तयार होतो. तिथला निसर्ग छान आहे, त्याची ओढ होतीच. पण अडचणीही लक्षात घेऊन जाण्याआधी भरपूर अनुभवी लोकांशी चर्चा केली. मानसिकदृष्ट्या स्वत:ला तयार  केलं. बाईवर फार सामान न घेता कमीत कमी सामान घ्यायचं ठरवलं. अनेकदा गावात उतरताना लांबून लोकांना कळायचं नाही आम्ही मुली आहेत ते पण आम्ही जेव्हा जवळ जायचो आणि हेल्मेट काढायचो तेव्हा ते आश्चर्यचकित व्हायचे आणि आमचं स्वागत करायचे. विशेषत: महिलांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळायचा. खार्दुंगलाला पोहोचल्यावर आम्ही पुढे नुंब्रा व्हॅलीलासुध्दा गेलो व तिथे एक रात्र घालवली. त्यामुळे खरंतर आमचा प्रवास हा चौदाशे किलोमीटरचा झाला.
एवढ्या महिला पंधरा दिवस एकत्र आणि भांडणं, गॉसिपिंग नाही हे म्हणजे अशक्यच, पण प्रवासादरम्यान असा कुठलाच प्रसंग घडला नाही. मोहिमेवर निघायच्या आधीच ठरवल्यामुळे सर्वांकडे फक्त गोड आठवणींचाच खजिना आहे. आज या अकरा जणींच्या कुटुंबीयांच्या माना अभिमानाने उंचावलेल्या आहेतच पण त्यांना स्वत:ला मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये विशेष स्थान आहे. या यशस्वी मोहिमेनंतर बायकरणीला आता खार्दुंगला ते कन्याकुमारी आणि भारताच्या समुद्रकिनाऱ्यांची मोटरबाईक मोहीम राबविण्याची ओढ लागली आहे.
            

बायकरीणबाई उर्वशी पाटोळे
उर्वशी पाटोळे या अवघ्या तेवीस वर्षीय तरूणीने बायकरणीची स्थापना केली असून, गेली सात वर्ष ती बाईक चालवत आहे. लष्करी पार्श्वभूमी असलेल्या उर्वशीचे वडिल हे सैन्यातील निवृत्त अधिकारी आहेत. तिची आई मिझोरामची असून, शाळेत असताना ती पोलो खेळायची व घोडेस्वारी स्पर्धांमध्ये सहभागी व्हायची. उर्वशीची मोठी बहिणसुध्दा पर्वतारोहक असून तिच्यापासून नेहमीच तिला प्रोत्साहन मिळत असतं. साहसी खेळ आणि समोर येईल त्या आव्हानांचा निधड्या छातीने सामना कराण्याचा वारसा घरातल्या मंडळींकडून तिला लहानपणापसूनच मिळाला आहे. उर्वशीने फर्ग्युसन महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केलं असून सध्या ती बॉश या कंपनीत बिझनेस मॅनेजमेंट ट्रेनर म्हणून काम करत आहे. उर्वशीने २०१० साली डर्ट ट्रॅक चॅम्पीयनशीप पटकावली असून महिंद्रासाठी प्रोफेशनल टेस्ट राईडर म्हणून देखिल काम करते. सध्या तिच्याकडे स्वत:च्या रॉयल एनफिल्ड स्टॅंडर्ड ३५०, महिंद्रा स्टॅलिओ आणि बजाज एक्सिड या तीन बाईक्स आहेत.

मुली कुठं आहेत?
लाहोर स्पिती चेकपोस्टवर सर्वजण आपापल्या बुलेटबरोबर थांबले होते, टिममधला एक माणूस पुढे गेला आणि त्याने अधिकाऱ्याला यादी दाखवली. सैन्यातील अधिकाऱ्याने नावाची यादी तपासली आणि विचारले या लिस्टमधील मुली कुठे आहेत? हे ऐकून आधी त्याला हसूच आले, पण नंतर त्याने सर्वांकडे बोट दाखवत म्हटलं या सर्व मुलीच आहेत. मुंलींनी आपापली हेल्मेट काढून चेहरा दाखवल्यावर त्या अधिकाऱ्याला विश्वासच बसेना. तो ते बघून अवाक झाला होता.


पांगचं आदरातिथ्य
पांग येथे एका ढाब्यावर आमचा मुक्काम होता. भरपूर थंडी असल्याने सर्वचजणी गारठून गेल्या होत्या. अंथरूणातूनही बाहेर यावसं वाटत नव्हतं, पण ढाब्याच्या मालकीणीने सर्व मुलींची जातीने काळजी घेतली. सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी, वेळोवेळी चहा, एवढंच नव्हेतर रात्रीचं जेवणही आमच्या बेडवर आमच्या हातात आणून दिलं. 

फक्त एक जागा शिल्लक
या ग्रुपमधली सर्वात लहान सदस्य शर्वरी मनकवाड (२१) हि आपल्या घरच्यांबरोबर सुट्टीनिमित्त सिक्कीमला गेली होती, त्यामुळे तिचा फोन बंद होता. फोन लागत नव्हता म्हणून फिरदोसने तिला मेसेज करून ठेवला होता. शर्वरीने पुणे एअरपोर्टवर उतरल्यावर आपला फोन चालू केला आणि मेसेज मिळाल्यावर लागलीच तिने फिरदोसला फोन केला. फिरदोस म्हणाली, बाईकवरून सर्व मुलींनी लेहला जायचं ठरलंय पण एकच जागा शिल्लक आहे. तुला यायचंय का? लेहला जायचं होतंच पण ती संधी एवढ्या लवकर चालुन येईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे क्षणाचाही विलंब न लावता मी हो म्हणाले. माझ्या आयुष्यातील आजवरचा हा सर्वात अविस्मरणीय अनुभव होता, असं ती सांगते.



Tuesday, September 6, 2011

बोल...


पुरे झालं आता
कंटाळा आला रोज त्याच रडगाण्याचा
एक बोट दुसऱ्याकडे, स्वत:कडे चार
खूप झाली टोलवाटोलवी
न संपणारं चक्र तोडणार कोण?
नको ढकलू उद्यावर
हिम्मत कर...बोल ll1ll

चौकटीबाहेरचं
परंपरेला छेद देणारं
चारचौघात बोललं न जाणारं
मनाला टोचेल असं
न पटणारं, पण शाश्वत सत्य
हिम्मत कर...बोल ll2ll

मोठ्यांना उलटून
कदाचित खोडसाळ
आकलन क्षमतेच्या पलिकडचं
बुध्दीला न पटणारं
बिटविन द टू लाईन्स
हिम्मत कर...बोल ll3ll

क्षणभर दु:खवण्यासाठी
अहंकार तोडण्यासाठी
जूनं दूर सारून
मारून-मुटकून भरलेलं
घातक असं
दूर फेकून देण्यासाठी
हिम्मत कर...बोल ll4ll

















रोज कण कण मरण्यापेक्षा
प्रत्येक क्षण जगण्यासाठी
मध्यांतरातच संपून न जाता
अंतीम पल्ला गाठण्यासाठी
स्वप्नपुर्तीसाठी
हिम्मत कर...बोल ll5ll

आपलेच खोटे ठरतील
मुलखाच्या बाहेर काढतील
कळपाच्या मागे धावू नकोस
वाहवत जाऊ नकोस
हिम्मत कर...बोल ll6ll

आढेवेढे न घेता
स्वत:च्या समाधानासाठी
एक पाऊल पुढे टाकून
नवनिर्मितीच्या ध्यासाने
धीर एकवटून
हिम्मत कर...बोल ll7ll

हिच वेळ आहे बंड करण्याची
घे लहान तोंडी मोठा घास
नव्या पायाभरणीसाठी
उद्याचा नवा सुर्य पाहण्यासाठी
हिम्मत कर...बोल ll8ll


Saturday, August 20, 2011

मतदारसंघ आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील परस्पर संबंध

प्रत्येक पिढी पुढच्या पिढीकडे त्यांचे विचार हस्तांतरीत करीत असते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रत्येक पुढच्या पिढीकडे राजकारणी आणि व्यवस्था भ्रष्टच असते हा संदेश हस्तांतरीत केला जात आहे, असं असताना मग राजकारणी आणि व्यवस्थेबद्दल विश्वास केव्हा निर्माण होणार? व्यवस्था सुधारायला हातभार केव्हा लागणार? मोठमोठ्या भ्रष्ट माशांना शिक्षा झालीच पाहिजे (कदाचीत लोकपाल हे त्यावरचं उत्तर असू शकेल), पण लहान माशांसाठी कायदे असताना ते जर 'चलता है' असा अटिट्यूट ठेवत असतील आणि व्यवस्था बिघडायला कारणीभूत ठरत असतील, बेजबाबदारपणे वागत असतील तर कुणी कुणाला जाब विचारायचा? हा प्रश्न अनुत्तरीच राहतो.
  
भारतासारख्या गरीब देशातील लोकशाहीची तुलना आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या पाश्चिमात्य देशातील लोकशाहींशी करणे चूक आहे. आपल्याकडील गरीब समाजाच्या आपापल्या नगरसेवक/आमदार/खासदारांकडून फार अपेक्षा असतात. आपल्या मतदारसंघाला खूष ठेवण्यासाठी लोकप्रतिनीधींना खूप काही करावे लागते. प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या घरी दररोज कमीत कमी एक-दोन हजार कप चहा होत असतो. लोकप्रतिनिधींला भेटावयास आलेल्या प्रत्येक व्यक्तीला किमान एक कप चहा द्यावाच लागतो. अन्यथा तो मतदार गावात जाऊन लोकप्रतिनिधींची बदनामी करतो. एवढे आपण भेटायला गेलो आणि नगरसेवक/आमदार/खासदाराने साधा कपभर चहासुध्दा दिला नाही. आता येऊ द्यात मतं मागायला. मग बघू त्याच्याकडे, असा विचार आमदार/खासदाराला भेटायला आलेली आणि चहा न मिळालेली व्यक्ती करते. लोकप्रतिनिधींकडून इतरही अपेक्षा असतात. गावातील कोणी आजारी असेल, उपचारासाठी मुंबईला नेण्याची गरज असेल अशा प्रसंगी हक्काने लोकप्रतिनिधींची मदत मागितली जाते. त्यांच्या ओळखीने मुंबईत रूग्णालयाची व्यवस्था व्हावी, त्यांच्याच आमदार निवासातील खोलित राहण्याची सोय व्हावी वगैरे अपेक्षा असतात. अशा प्रकारच्या अपेक्षा पुर्ण कराव्याच लागतात. यासाठी लोकप्रतिनिधींला पक्षाकडून कोणतीही मदत मिळत नाही. हा खर्च त्यांनी कसा करावा?

लोकप्रतिनीधींनी आयोजित केलेल्या धार्मिक सण उत्सवांना अनेकजण मोठ्या उत्साहाने हजेरी लावतात. तिथे मिळणाऱ्या भेटवस्तूंना नाही म्हणत नाहीत, टोपी, टि-शर्ट, बिर्यांणी, वडा पाव मिळणार असेल तर त्यांना आपली विचारसरणी बासनात गुंडाळून बाजूला ठेवून पाठिंबा देतात. त्यावेळी व्यवहारात येणाऱ्या पैशांचा हिशेब कोणीच मागताना दिसत नाही, कारण धार्मिक भावनांना पैशांनी तोलायला आपल्याकडे बंदी आहे आणि तसा मुद्दा पुढे आला तर काय होतं ते वेगळं सांगायला नको.  

काही वर्षांपुर्वी के.सी. कॉलेजमध्ये झालेल्या एका जाहिर सभेत जॉर्ज फर्नांडिस यांनी या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा मांडला होता. त्यांना सभागृहात उपस्थित असलेल्यांना विचारले होते कि, तुमच्यापैकी किती लोक नियमितपणे एखाद्या राजकीय पक्षाला देणगी देतात? एकही हात वर गेला नाही. अशा परिस्थितीत तुमचे व्यवहार कसे चालतात. असा प्रश्न विचारण्याचा कितीसा अधिकार आपल्याला आहे? याचाच अर्थ असा की, राजकीय पक्षांच्या अर्थकारणाची काहीतरी समाजमान्य व्यवस्था करणे गरजेचे आहे. मगच आपल्याला राजकारणातील भ्रष्टाचाराचा जाब विचारण्याचा हक्क प्राप्त होईल.   

Thursday, February 3, 2011

युअर ऑर्डर डज मॅटर!!!


मीरा - ब्लॅक कॉफी बिना चिनी के, लडकीयोंको इंप्रेस करने के लिए?
जय - तुम तो ज्यादा इंप्रेस नही लग रही हो?
मीरा - आय फील लाईक प्युकींग...यककक

लव आज कल चित्रपटातील सैफ अली खान आणि दिपिका पदुकोने मधला हा संवाद. चित्रपटात दाखवलं जाणारं सर्वच काही खरं नसतं, पण या प्रसंगानंतर थिएटरमध्ये उपस्थित असलेलं प्रत्येक जोडपं एकमेकांकडे बघतं आणि मिश्किलपणे हसतं. कारण त्या प्रसंगामध्ये बऱ्याच जुन्या आठवणी घर करून असतात.

हल्ली पहिल्या डेटींगसाठी भेटायचा हॉट स्पॉट म्हणजे कॉफी शॉप. त्यामुळे तुम्ही ज्या प्रकारची कॉफी मागवाल त्यावरून तुमचा स्वभाव जज केला जातो. त्यामध्ये अर्ध्याहून अधिक मुले एक्सप्रेसो (विदाऊट शुगर) किंवा अडल्ट हॉट चॉकलेट (फ्लेवर्ड विथ रम ऑर आयरीश क्रिम), तर मुली हॉट चॉकलेट (डार्क एन्ड स्ट्रॉग) किंवा कॅफे फ्रेडो (आइस कॉफी) ऑर्डर करतात. दोघानांही आपल्या ऑर्डर वरून आपला स्वभाव (खरा-खोटा) एकमेकांच्या लक्षात आणून द्यायचा असतो. पण खरी मजा तर पुढे येते, जेव्हा धाडस करून मागवलेली ती न आवडणारी कॉफी कडू किंवा फारच कोल्ड वाटायला लागते. मग काय, जिवावर आल्यासारखं एक एक घोट घेऊन खोटी स्माईल द्यायची आणि प्रसंग मारून न्यायचा, कारण तोपर्यंत समोरच्याचा खरा स्वभाव काय आहे याबाबत डोक्यात चक्र फिरायला लागलेली असतात. त्यामुळे तुमचा खरा स्वभाव हा तुम्ही कोणती कॉफी ऑर्डर करताय यावरून खरंच लक्षात लक्षात येतो का? तर त्याचं उत्तर होअसंच देता येईल. कारण हा पहिला प्रसंग संपुर्ण चित्र क्लीअर करतो.

दुसऱ्या भेटीत मग प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार ऑर्डर प्लेस करतात. मग मुलगा कॅफे लाटे (एक्सप्रेसो, मिल्क आणि फोम) आणि मुलगी कॅपॅचिनो (एक्सप्रेसो, मिल्क, फोम) मागवायला लागते. त्यानंतरच्या भेटींमध्ये मात्र मग व्हरायटी असते. प्रत्येकजण आपल्या रेग्युलर ब्रँडकडे वळतो आणि मग खऱ्या स्वभावानुसार (खिशाला काय परवडतंय, आपल्या पार्टनरला काय आवडतंय, क्वान्टीटी कशाची जास्त येते, कशाबरोबर एक्स्ट्रा क्रिम/चॉकलेट आहे किंवा मग आज काहीतरी नवीन ट्राय करूयात) यानुसार एक्सप्रेसो कॉन क्रिमा, कॉपीक्युनो, आईस एस्कीमो, हॉट मोकाविथ चॉकलेट सिरप, कॅरॅमल लाटे, चॉकलेट फॅंटसी, आयरीश कॉफी, कोल्ड कॉफी, फ्लेवर्ड कॉफी (चॉकलेट, आयरीश, कॅरॅमल), ब्लॅक कॉफी (एक्सप्रेसो, अमेरीकॅनो/रीस्ट्रेटो), ट्रॉपीकल-आईसबर्ग, हॉट चॉकलेट (थिक) ची ऑर्डर होते. अनेकवेळा तुमच्या भेटायच्या फेव्हरेट ठिकाणी व तिथल्या फेव्हरेट टेबलावर ऑर्डर न देताच फक्त इशाऱ्यावरूनच ऑर्डर येते, कारण तुम्हा दोघांव्यतिरिक्त तिथल्या वेटरलासुध्दा तुमचा स्वभाव लक्षात आलेला असतो. आणि गंमत म्हणजे म्हणूनच वेळ-प्रसंग बघून स्वभावानुसार कधी कधी तो पण नवीन नवीन ऑर्डर सुचवत असतो.

या जोडप्यांबरोबरच कॉफी शॉपमध्ये कोपरा अडवून बसलेलेलीही बरीचशी मंडळी असतात. कुणी पुस्तक वाचत, कुणी गिटार वाजवत, कुणी काही लिहीत, लॅपटॉपवर काम करत, तसेच फक्त बर्ड वॉचिंगलाही बरीच मंडळी नित्यनियमाने येऊन बसत असतात. पण मग त्यांच्या ऑर्डर्स या अनेकदा ठरलेल्या किंवा कॅफे मधल्या एकंदरीत वातावरणावरून ठरत असतात. उदा. बाजूच्या टेबलावर कोणी हाय हिलवाली येऊन बसली तर महाशयांची ऑर्डर एक्सप्रेसो (विदाऊट शुगर) शिवाय काय असू शकते?

कॉफी बारमध्ये प्रत्येक स्वभावाच्या माणसासाठी काही ना काही तरी असतं आणि नसेल तरी ऑर्डर प्रमाणे बनवून दिलं जातं, म्हणूनच प्रत्येकाला तिथे एकदातरी जावसं वाटतं. त्यानंतर स्वभावानुसार तो किंवा ती पहिल्या विझिट नंतर पुर्णविराम देतात तर अनेकजण काही ना काही कारणाने तिथल्या वाऱ्या करायला लागतात. शेवटी हे त्यांना आवडणाऱ्या कॉफीवर आणि स्वभावावर अवलंबून आहे. म्हणूनच युवर ऑर्डर डज मॅटर!!!    

‘सवाई’ची मानकरी ‘गिरगाव व्हाया दादर’!


 वर्षभरातील एकांकिका स्पर्धांची फायनल आणि सर्वौत्तम एकांकिकांची मेजवानी म्हणजे चतुरंगची सवाई एकांकिका स्पर्धा. गेल्या 23 वर्षांपासून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला प्रारंभ होऊन प्रात:काली राष्ट्राला संपूर्ण वंदे मातरमने वंदन करून पारितोषिक वितरणाने संपन्न होणारी मुंबईतील, महाराष्ट्रातील, देशातील नव्हे तर (कदाचित) संपूर्ण जगातील सवाई ही एकमेव एकांकिका स्पर्धा असावी. एकूण 27 प्रथम पारितोषिक विजेत्यांमधून निवडल्या गेलेल्या सात एकांकिकांची अंतीम फेरी परवा मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात पार पडली. दरवर्षी नेमाने नाट्य जागरण करणाऱ्या नाट्यप्रेमींनी यावर्षीही उत्स्फुर्त प्रतिसाह देत तासाभरातच तिकीटबारीवर हाऊसफुल्लचा बोर्ड झळकावला होता. या 24 व्या नाट्यजागरणाचा घेतलेला हा आढावा.
 
-----------------------------------

त्यांचा परफॉरमन्स झाला आणि नाट्यगृहात एकच चर्चा सुरू झाली, की आता दुसऱ्या क्रमांकाचा दावेदार कोण? अनेकांनी तर प्रेक्षक पसंतीसाठी दिलेल्या पत्रिकेतील चार हा आकडा पण फाडून बाजूला ठेवल्याचं ऐकू येत होतं. कोण म्हणतं देणार नाय...घेतल्या शिवाय जाणार नाय... या घोषणा खऱ्या ठरवत परिक्षकांनी निकाल जाहीर करण्याअगोदरच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला आणि व्हाया आयएनटी, मृगजळ असा प्रवास करत एम.डी. कॉलेजची गिरगांव व्हाया दादरही एकांकिका चोविसाव्या सवाई एकांकिका स्पर्धेत सवाई एकांकिका ठरली. महाराष्ट्र राज्य हे 2010-2011 वर्ष आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करीत आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी तरूण, बायका, म्हातारी मंडळी ते शाळेत जाणाऱ्या पोरांपासून सर्वांनीच यात सहभाग घेतला होता. परदेशी शक्तीपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर आपल्याच देशातील लोकांबरोबर लढताना 105 हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. हा लढा कसा दिला गेला, ते दिवस कसे होते याचं चित्रण गिरगांव व्हाया दादर या एकांकीकेत करण्यात आलं आहे. दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकारांनी आपली कामगिरी चोख बजावली असली तरी लेखनात ही एकांकिका कमी पडते. पण पन्नासहून अधिक कलाकारांच्या साथीने उत्कृष्ट प्रकाशयोजना आणि प्रसंगानुरूप अतिशय कल्पक नेपथ्याव्दारे व्दारे हा सारा लढा स्टेजवर पाहताना आपणही त्या काळात गेल्यावाचून राहत नाही. भूषण देसाई (सवाई प्रकाशयोजनाकार), सचिन गावकर ( सवाई नेपथ्य), अमोत भोर ( सवाई दिग्दर्शक) आणि प्रेक्षक पसंती ही पारितोषिके पटकावत सवाईमध्येही आपली घौडदौड कायम ठेवली. गिरवाव व्हाया दादरच्या जोडीने अनेक स्पर्धा गाजणाऱ्या व मृगजळमध्येही दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलेल्या मुंबई विद्यापीठाच्या एक दोन अडीचया एकांकीकेला सवाईकडून भरपूर अपेक्षा होत्या. पण त्यांना इथेही व्दितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं. थिअरी ऑफ रीलेटीविटीवर आधारीत ही एकांकिका फक्त दोनच पात्रांची होती. आयुष्यात कोणत्याही घटना या योगायोगाने होत नसून घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा एकमेकांशी काही ना काही तरी संबंध असतो. जीवनात खचून न जाता समोर आलेल्या प्रत्येक अडचणींवर सकारात्मकपणे व शांतपणे विचार केला तर कुठल्याही कठीण प्रसंगातून सहजपणे मार्ग काढता येतो, हे निनाद लिमये व सुनिल तांबट या दोघांनी त्यांच्या दमदार परफॉरमन्सव्दारे दाखवून देऊन ते प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले होतेच, पण निनाद लिमये हा तर सवाई अभिनेत्याचा दावेदार मानला जात होता. पण एकांकिका व्दितीय व सुनिल तांबट (सवाई लेखक) ही पारितोषिकं पटकावत थोडा लांबलेला परफॉरसऩ्स, संगीत आणि प्रकाशाच्या अभावामुळे ही एकांकिका पिछाडीवर पडली. 
सर्वच आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतीम फेरीत हसखास आढळणारं, दमदार परफॉरमन्स देणारं व हमखास पारितोषिकं पटकावणारं कॉलेज म्हणजे डी.जी.रूपारेल कॉलेज. वेगळे विषय आणि तेवढीच वेगळ्या पध्दतीची मांडणी म्हणूच रूपारेलने नेहमीच आपली छाप पाडली आहे. यावर्षीची “18 Till I die” ही देखील तशाच वेगळ्या धाटणीची होती. सोशल नेटवर्कींगच्या जमान्यात फेसबुकवर टाकलेले स्टेटस् खरंच रीयल असतात का? त्यावर टाकलेल्या स्टेटसव्दारे खरंच आपल्याला काय म्हणायचंय, आपल्या मनातील भावना या लोकांपर्यंत पोहचत असतात का? तसेच दिसण्यावरच सर्व गोष्टी अवलंबून असतात की आपला स्वभाव आणि भावनांना अधिक महत्व असतं याचं उत्कृष्ट चित्रण या एकांकीकेत होतं. तुषार घोडीगावकरने साकारलेला नीरज तर सर्वांना आवडून गेलाच पण समृध्दी घुमरेच्या संयत अभिनयाने तिला सवाई अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवून दिला. याच एकांकीकेच्यावेळी पुढच्या सीनची उत्कंठा वाढवणारा सीन संपल्यावर शेवटच्या सिनच्या आधी अचानक लाईट ट्रॅप झाले आणि परफॉरमन्स थांबला. काय झालं? अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये चालू होताच लाईट ट्रॅप झाल्याचं जाहीर करण्यात आलं आणि चोख परफॉरमन्सला इथे खंड पडला. पण मग प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिलं आणि मिनिट भरातच पुढचा सीन सुरू झाला.

एकांकिका संपली की गरम चहा आणि कॉफीचे घोट घेत सिगरेटचे झुरके मारत चर्चा रंगत होत्या. रात्र जशी वाढत होती तशी डोळ्यावर झोपेची झापडंही चढत होती. पण खरी झोप उडवली ते मुंबईच्या ठाकूर महाविद्यालय, विज्ञान आणि वाणिज्य या कॉलेजच्या पडद्याआड हया एकांकीकेने. ही एकांकिका म्हणजे नव्या दमाच्या कलाकारांची खास मेजवीनी होती. एकांकीकेतील हेमा (वैभवी आंबोळकर), जया (सुवेधा देसाई) आणि बुवा (गौरव मोरे) या पात्रांची एनर्जी तोंडात बोटे घालायला लावणारी होती. समाजात माणसांमध्ये जातीवरून अजूनही भेदभाव केला जात असताना समाजाचं प्रतिबिंब, समस्या ज्या रंगभूमीच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडल्या जातात तिथेही प्रमुख कलाकार व बॅकस्टेज आर्टीस्ट हा भेदभाव कसा केला जातो हे अतिशय नेमक्याच नेपथ्याचा योग्य वापर करून विनोदी पध्दतीने मांडण्यात आलं होतं. कुठल्याच बाबतीत फारसा दम नसलेली ही एकांकिका हाय एनर्जी परफॉमन्स आणि काही चांगल्या व पीजे छाप विनोदांनी सर्वांचं मनोरंजन मात्र करून गेली. लवबर्ड्स, वि.वा.ट्रस्ट, विरार या एकांकीकेत तारूण्याच्या उंबरठ्यावर असताना सतत मनाची कशी घालमेल होत असते हे दाखवण्यात आलं होतं. प्रेम म्हणजे नक्की काय? मनानं एकमेकांच्या जवळ असणं की शरीरांनं? याचा उलगडा होत नसतो. मित्रांचं ऐकायचं, की आपल्या मनाला जे योग्य वाटतंय ते करायचं या दोलायमान स्थितित मन असतं.  आपण शरीराने जवळ आलो तरच आपल्यातलं नातं अधिक घट्ट होईल अशा स्वभआवाचा तो आणि आपली इच्छा नसतानासुध्दा जर तु हे केलंस तर आपण शरीराने तर जवळ येऊ पण मनाने नाही हे समजावणारी ती या एकांकीकेत होते. लेखनातून बाहेर आलेले काही मजेदार प्रसंग सोडले तर या एकांकीकेत नवीन असं काहीच नव्हतं. अशीच आणखी एक एकांकिका म्हणजे झुंपा लाहिरी यांच्या कथेवर आधारलेली पर्णिका संस्था, मुंबईची दि लास्ट डीनर. जुना विषय आणि ठिसाळ मांडणी यामुळे एकांकीकेतील अनेक कच्चे दुवे समोर येत होते. लाऊड म्युझीक आणि वाईट प्रकाशयोजना यामुळे ही एकांकिका फार रंगलीच नाही.

एम.आय.टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुण्याच्या “HTTP 404: Page Not Found” ने मात्र तगडा परफॉरमन्स देत क्रमांकासाठीची दावेदारी कायम ठेवली होती. थोड्या वेगळ्या आणि थेट तरूणांशी निगडीत विषयावर भाष्य करणारी ही एकांकिका होती. बदलत्या जीवनशैलीमुळे मुलं आणि पालक यांच्या नात्यात झालेला बदल आणि त्याला चांगल्या-वाईट या दोन्ही अर्थांनी मिळालेली इंटरनेटची (पर्यायाने सोशल नेटवर्कींग साईटची) साथ कशाप्रकारे खऱ्या नात्यांतला गोडवा नष्ट करून व्हर्च्युअल रीएलीटीमध्ये जगण्यात कसा आनंद देत आहे हे मांडण्यात आलं होतं. लेखनात चांगली उतरलेल्या ह्या एकांकीकेने शेवटचा दमदार परफॉरमऩ्स देत स्पर्धेतील निकालातील उत्कंठा कायम ठेवण्यात भरपूर मदत केली. या एकांकीकेतील प्रमुख भूमिका करणाऱ्या आरोह वेलणकरने अपक्षेप्रमाणे सवाई अभिनेत्याच्या ट्रॉफीवर नाव कोरलं तर सवाई ध्वनीसंयोजनाचं पारितोषिक रोहित वेखंडे यानं पटकावलं.
एकंदरीत यावर्षीच्या स्पर्धेत तरूणांचे प्रश्न मांडणाऱ्या, तरूणांना ज्या प्रश्नांबद्दल आपुलकी आहे अशा विषयांच्या एकांकिका पहायला मिळाल्या. अंतीम फेरीचे परिक्षक म्हणून अभिनेते सदाशिव अमरापूरकर, संगीत कुलकर्णी आणि नाट्य लेखक आनंद म्हसवेकर यांनी काम पाहिले.  

Monday, January 24, 2011

‘धोबी घाट’ उत्तरोत्तर रंगत जाणारी डायरी...


फार पुर्वी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, एक प्रसिध्द इंग्रजी लेखक मुंबईत आला होता आणि मुंबईतील धोबी घाटाचं वर्णन करताना तो म्हणाला होता की इथे रोज सकाळी काही लोक ओल्या कपड्याने काळा दगड फोडायचा प्रयत्न करतात, दगड फुटत नाही पण प्रयत्न त्याच जोमाने चालू राहतो. हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच किरण राव दिग्दर्शित धोबी घाट (मुंबई डायरीज्) हा चित्रपट पाहिला. वर नमूद केल्याप्रमाणे त्या इंग्रजी लेखकाने मुंबईच्या माणसांवर, त्यांच्या स्वभावावर भाष्य केलं होतं. धोबी घाटमध्ये सुध्दा तेच आहे. दोन तासांहून कमी लांबीचा, मध्यांतर नसलेला हा चित्रपट एक वेगळी छाप सोडून जातो. अंतर्मुख होऊन आपला आपल्याच विचार करायला भाग पाडतो. चित्रपटातील सर्वच कलाकारांची कामे उत्कृष्ट झाली आहेत. मुख्य म्हणजे आवश्यक तेवढेच संवाद आणि संगीताचा योग्य वापर यामुळे मुंबईची ही डायरी उत्तरोत्तर अधिकच रंगतदार होत जाते. 

जगाच्या नकाशावर मुंबईला एक वेगळं अस्तित्व आहे. इथल्या लोकांबाबत फार पुर्वीपासून सर्वांना कुतूहल वाटत आलंय. त्यांचं राहणीमान, त्यांचे स्वभाव, जगण्याची पध्दत हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जगभरातल्या पर्यटकांबरोबरच, भारतातल्या कुठल्याही गावातील असो वा शहरातील व्यक्तीस मुंबईला आवर्जुन भेट द्यायची असते. तिथे राहणारा माणूस कितीही गरीब असला तरी त्याबद्दल त्याला अप्रूप असतं. म्हणूनच घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या या मुंबईच्या माणसाच्या भाव-भावनांचं चित्र रेखाटणं आव्हानात्मक काम आहे. धोबी घाट (मुंबई डायरीज्) मध्ये किरण राव यांनी हे आव्हान यशस्विरित्या पेलल्याचं दिसतं. चित्रपटातील चारही प्रमुख भूमिकांच्या माध्यमातून मुंबईचं अस्सल रूप समोर येतं. खरं तर चित्रपटातील गोष्टी या नवीन नसून त्या ज्या पध्दतीने मांडल्या गेल्या आहेत, ते वाखाणण्याजोगं आहे. कुठेही भंपकपणाचा आव न आणता, कमीत कमी पात्रांद्वारे आणि उत्कृष्ट पटकथेमुळे ह्या चित्रपटात अनेक प्रसंगांनंतर वाह...क्या बात है! हे बोलायला भाग पाडतो, यातंच त्याचं यश लपलेलं आहे.