Thursday, November 25, 2010

असावा सुंदर चॉकलेटचा मनोरा...


दिल्ली गुरगाव येथील अ‍ॅम्बीयन्स मॉल लोकांनी खचाखच भरला होता. सर्वजण त्या सुवर्णक्षणाची आतुरतेने वाट बघत होते. मॉलच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरील सर्व पायऱ्यांवर लोकांनी मोक्याच्या जागा पटकावल्या होत्या. त्याला निमित्तही तसेच होते. कितीही मोठे असले तरी हाताच्या मुठीत मावणारे चॉकलेट आज मिठी मारूनसुद्धा पकडता येणार नाही अशी परिस्थिती होती. मास्टरशेफच्या टायटल ट्रॅकवर सर्वाचेच पाय थिरकत असताना लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत चमूने हा चॉकलेट एक्लेअर हा भारतातील सर्वात उंच म्हणजेच २६.८ फूट आहे असे जाहीर करताच मॉलमध्ये एकच जल्लोष झाला. जवळपास ५०० हून अधिक लोकांच्या साक्षीने भारतातील सर्वात उंच चॉकलेट एक्लेअर पिरॅमिड म्हणून यावर शिक्कामोर्तब झाले. स्टार प्लस वाहिनीवरील अमूल पुरस्कृत ‘मास्टरशेफ इंडिया’ या कार्यक्रमातील अंतिम १२ स्पर्धक आणि दी लीला केम्पन्स्की (दिल्ली) च्या स्वयंपाकघरातील कुशल बल्लवाचार्य अर्थात शेफ यांच्या चमूने ७२ तासांच्या प्रयत्नातून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवून विक्रम केला. 
एक हजार लिटर दूध, ८०० किलो पीठ, वीस हजार अंडी, ५०० किलो अमूलचे लोणी, ४५० किलो चॉकलेट, १६ हजार चॉकलेट फिल्ड एक्लेअर्स वापरून हे पिरॅमिड तयार केले होते. तीन वेगवेगळ्या थरांमध्ये तयार केलेले भाग एकत्रित करून मग ते सुरक्षितरीत्या एकमेकांवर रचण्यात आले. त्यानंतर रोलर ब्रशच्या साहाय्याने पिरॅमिडचा आकार देण्यात आला. 
‘आम्ही जे ठरवले होते, आमचे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात साकार झाले’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करून चमूचे प्रमुख व दी लीला हॉटेलचे कार्यकारी बल्लवाचार्य थॉमस फिगोव्क यांनी विक्रम नोंदवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, आजवर वेगवेगळे सन्मान मिळाले पण लिम्का बुक विक्रम करण्याचा सन्मान हा जगमान्य आहे. ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रमातील नव्या दमाच्या १२ बल्लवाचार्यासोबत काम करण्याचा अनुभव खूपच मजेदार होता, असेही त्यांनी सांगितले. 
देशाच्या विविध राज्यांतून नावाजलेले नव्हे तर घरच्या घरी पाककलेत ‘मास्टर’ असलेले हे बल्लवाचार्य ‘मास्टरशेफ इंडिया’ या कार्यक्रमाद्वारे प्रथमच लोकांसमोर आले आणि अंतिम फेरीत पोहोचले आहेत. त्यांनी कार्यक्रमातून दाखविलेल्या अनेक पाककृतींची चव आता प्रेक्षकांच्या घरातील मंडळींमध्येही चाखली जात आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या अनोख्या विक्रमामुळे तर हे या नवोदित ‘मास्टरशेफ’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. ‘टेस्टी डिश वरना गेम फिनीश’ असे वारंवार म्हणणारा अक्षयकुमार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असून त्याने सांगितलेला हा कानमंत्र लक्षात ठेवूनच चांगली चवदार डिश तयार करण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो, असे स्पर्धक जयनंदन भास्कर याने सांगितले.  
लिम्का बुकात नोंदलेल्या या विक्रमाचा महत्त्वाचा भाग असलेले आणखी दोन जण म्हणजे ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रमातील प्रमुख बल्लवाचार्य कुणाल कपूर आणि अजय चोप्रा. देशात पहिल्यांदाच एखाद्या टीव्ही कार्यक्रमाद्वारे विक्रम नोंदविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे असे मत या दोघांनी व्यक्त केले. 
नेहमीचा रेसिपी कार्यक्रम करण्यापेक्षा वेगळे काही करण्याच्या विचाराचा भाग म्हणजेच हा ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रम होय, असे ‘स्टार प्लस’ वाहिनीच्या या प्रवक्त्यांनी सांगितले. 
हा विक्रम पाहायला आणि त्या भव्य चॉकलेट पिरॅमिडची चव चाखायला दिल्लीतल्या मॉलमध्ये खवय्या आणि प्रेक्षकांची तोबा गर्दी उसळली होती.

मुंबईकर प्रितेश चोटानीची निवड
‘मास्टर शेफ इंडिया’ या कार्यक्रमातील अंतिम १२ स्पर्धकांमध्ये मुंबईचा प्रितेश चोटानी याचीही निवड झाली असून तो एका कंपनीत ब्रॅण्ड मॅनेजर म्हणून काम पाहतो. घरात बल्लवाचार्य आणि घराबाहेर ब्रॅण्ड मॅनेजर म्हणून तो लीलया वावरतो. अत्यंत व्यस्त कार्यक्रमांतूनही तो आठवडय़ातून निदान ४-५ वेळा तरी स्वत: काहीतरी पाककृती बनवतो. तयार केलेल्या पाककृतींचे फोटो काढून त्याचे डॉक्यूमेंटेशनही तो आवर्जून करतो. विशेष म्हणजे एकदा तयार केलेला पदार्थ पुन्हा पुन्हा बनवायचा नाही यावर त्याचा भर असतो. सूत्रसंचालक आणि अभिनेता अक्षय कुमार याच्यासाठी नवनवीन पाककृती तयार करताना खूप मजा येते असे सांगून प्रितेश म्हणाला की, एकदा चॉकलेट आणि मँगो पराठा बनवला. त्याची चव घेताना अक्षय कुमारने बटर ऐवजी तूप वापरले असते तर पदार्थ अधिक चवदार झाला असता अशी सूचना केल्याचे त्याने आवर्जून सांगितले. खवय्येगिरी आणि खवय्यांसाठी पाककृती बनविण्याची प्रचंड आवड असलेल्या प्रितेशचा यासंदर्भात ब्लॉगही आहे. नवीन पाककृती तयार करून त्याची माहिती या ब्लॉगद्वारे तो लोकांपर्यंत पोहोचवितो. ‘मास्टरशेफ इंडिया’ कार्यक्रमामुळे त्याच्या ब्लॉगलाही तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे प्रितेशने सांगितले. मास्टरशेफ इंडिया हा कार्यक्रम दर शनिवार व रविवारी रात्री ९ वाजता स्टार प्लस वाहिनीवरून दाखविण्यात येतो.