स्वत:च्या आयुष्यात काहीतरी वेगळं करू इच्छिणाऱ्या आणि इतरांच्याही आयुष्यामध्ये काहीतरी वेगळेपण आणू इच्छिणाऱ्या तरुणांचे मुक्त व्यासपीठ असलेल्या अमरावती येथील प्रयास या संस्थेने आयोजित केलेलं सेवांकुरचं सातवं शिबीर २० ते २२ ऑगस्ट दरम्यान आनंदवन, वरोरा येथे नुकतेच पार पडलं. त्याविषयी..
अमरावती, नांदेड, सोलापूर, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, मुंबई, पुणे, नाशिक या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास २०० तरुण यात सहभागी झाले होते. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेले वक्ते हे आयुष्यात काय करावं या गोंधळातून बाहेर पडलेले, वयाने, वृत्तीने आणि मनाने तरुण असतातच आणि वैशिष्टय़ म्हणजे एखादा अपवाद सोडला तर पूर्ण तीन दिवस सहभागींबरोबर वास्तव्य करतात. शिबिराच्या पहिल्याच सत्रात आयोजक डॉ. अविनाश सावजी म्हणाले की, ''we share emotions than information'', कारण जर एखादी गोष्ट मनाला पटली तरच ते कार्य आपण हसतमुखाने हाती घेऊन पुढे नेतो. २००७ साली झालेल्या सेवांकुरच्या पहिल्या शिबिराला बाबा आमटेंचे आशीर्वाद लाभले होते. त्यावेळेस ते म्हणाले होते की, ‘‘अंकुर म्हणजे तो, जो दगड फोडून आकाशाच्या दिशेने झेप घेतो तो. आयुष्यात कधीही समाजसेवा न करता समाजसुधारणा करा तरच प्रगत समाज निर्माण होऊ शकेल.’’
सेवांकुरची खासियत म्हणजे इथे विद्वत्तापूर्ण भाषणं नसून संवादाच्या माध्यमातून सत्र होतात. वक्त्यांच्या मुलाखतींसाठी सहभागींमधीलच काही तरुणांना आमंत्रित केले जाते. म्हणूनच दिवसेंदिवस सहभागींची संख्या वाढत असून, गेल्या तीन वर्षांत पंधराशेहून अधिक तरुण यात सहभागी झाले आहेत. हा तीन दिवसांचा प्रवास आनंददायी व्हावा, आठवणीत राहावा आणि वातावरण उत्साहाने भरून टाकण्यासाठी तसेच नव्या आशा, उमेद व प्रेरणा जागविण्यासाठी प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला एक गीत म्हटले जाते. त्यामध्ये साने गुरुजी, वसंत बापट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ग. दि. माडगुळकर इ.बरोबरच नव्या कवींच्या मराठी आणि हिंदी गीतांचा समावेश असतो. सकाळी सहा वाजता सुरू होणारा दिवस रात्रीचे दोन वाजले तरी संपत नाही. वेळापत्रकानुसार सत्र होत असली तरी अनेक ज्येष्ठ अनुभवी मित्र प्रत्येक शिबिराला आवर्जून येतात त्यामुळे शक्य होईल तेव्हा त्यांचेही मार्गदर्शन घेण्यासाठी तरुणांची धाव असते. वक्त्यांशी संवाद साधताना अनेक गोष्टी या हृदयाला भिडत असतात, पण प्रत्येक वेळी पाणावलेल्या डोळ्यांनी टाळ्या पिटायच्या स्थितीत आपण नसतो त्यामुळे अशा वेळी काहीही न बोलता त्या भारलेल्या वातावरणात आपला एक हात वर करून दाद देण्याची पद्धतही न्यारीच म्हणावी लागेल. यावेळी शिबिराला वक्ते म्हणून धनंजय वैद्य, डॉ. अविनाश पोळ, दादाजी खोब्रागडे, रेखाताई चोंडेकर, डॉ. भाऊसाहेब उबाळे, आदेश बांदेकर, डॉ. अश्विनी जोजरा, कौस्तुभ आणि पल्लवी आमटे आणि विकास आमटे लाभले होते.
मित्रांमध्ये पर्यावरणग्रस्त म्हणून परिचित व व्यवसायाने आर्किटेक्ट असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील, आजरा तालुक्यातील रायवाडा या खेडय़ात राहून ग्रीन जीवनशैली स्वत: जगणारे धनंजय वैद्य हे शिबिरातील पहिले वक्ते. स्वत:च्या गरजा कमी ठेवून निसर्गगामी पर्यायांच्या शोधात स्वावलंबनाच्या दिशेने प्रयोगशील वाटचाल करणारे वैद्य म्हणाले की, दरवर्षी भारतातल्या कुठल्याही एका आर्किटेक्ट कॉलेजमध्ये कमीतकमी एक हजार डिझाइन्स तयार होतात, पण एकाही कॉलेजमध्ये शेतकऱ्याचं घर डिझाइन करायला दिलं जात नाही. ग्रीन जीवनशैलीबाबत फक्त बाता न करून ती अमलात आणायला हवी तरच आपण निसर्गाशी स्पर्धा करू शकू अन्यथा तो आपलं रौद्र रूप दाखविल्याशिवाय राहणार नाही. इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण झालेले, आजही फक्त दीड एकर जमिनीवर शेतीचे वेगवेगळे प्रयोग करणारे नांदेड जि. चंद्रपूर येथील दादाजी रामजी खोब्रागडे हे शिबिरातील दुसऱ्या सत्राचे वक्ते. तांदळाच्या दहा नव्या जातींचा शोध लावणाऱ्या या शेतकऱ्याचा आय. आय. एम.ने त्यांच्या कामाची दखल घेऊन गौरव केला, परंतु एक शेतकरी म्हणून महाराष्ट्र सरकारला त्यांची व्यवस्थित दखल घेता आलेली नाही ही बाब खेदजनक आहे. गरीब शेतकऱ्याला वैज्ञानिक पद्धतीने आपलं संशोधन सिद्ध करता येत नाही, त्यामुळे शेतीचा अभ्यास करणाऱ्या आजच्या तरुणांनी पुढे येऊन ही दरी भरून काढली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. संध्याकाळच्या सत्रात बाबा आमटेंचा मोठा मुलगा विकास आमटे यांनी सहभागींशी संवाद साधला. ‘आनंदवन बंद करणं’ हे आमचं ब्रीदवाक्य आहे असं ते सुरुवातीलाच म्हणाले, कारण महारोग हा समाजवादी आहे. समाजाने या सर्वाना आपलं म्हटलं की आमचं काम संपणार. महारोगींची संख्या कोटीच्या घरात असतानाही आजवर महारोग्यांवर उपचार करणारं एकही प्रायव्हेट हॉस्पिटल कुणी काढलेलं नाही, तीस सेकंदाच्या जाहिरातीत महारोग्यांबद्दल बोलण्यासाठी सिनेतारका लाखो रुपये घेतात पण मदत कोणीच करीत नाही. परमेश्वर सर्व नीट करेल हे मला पटत नाही. तो चालत नाही, बोलत नाही, बघत नाही, ऐकत नाही त्यामुळे तोच माझा पहिला पेशंट आहे असं बाबा आमटे म्हणायचे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीने याचं गांभीर्य लक्षात घेऊन मदतीस पुढे येण्यास त्यांनी सांगितलं. पहिल्या दिवसाचा शेवट हा गटचर्चेने झाला. आपल्याला आजवर आलेले चांगले-वाईट अनुभव व आपल्याला आयुष्यात काय करावंसं वाटतंय हे शेअरिंग रात्री दोन वाजेपर्यंत चालू होतं.
दुसरा दिवस पुन्हा पहाटे सहा वाजता सुरू झाला. तासभर वेगवेगळे खेळ खेळल्यानंतर आंघोळ आणि न्याहरीनंतर बरोबर नऊ वाजता पहिलं सत्र सुरू झालं. या सत्राचे वक्ते होते मूळ सातारा जिल्ह्याचे रहिवासी, कॅनडाच्या मानवाधिकार आयोगाचे पहिले हायकमिशनर डॉ. भाऊसाहेब उबाळे. महाराष्ट्रातल्या एका छोटय़ाशा खेडय़ातल्या भाऊसाहेबांनी आज आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलंय. जगातले सर्व पंतप्रधान हे त्यांचे मित्र आहेत, म्हणूनच ते म्हणाले आयुष्यात मोठी स्वप्नं बघायला शिका. इच्छा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची आपली तयारी असेल तर काहीच अशक्य नाही. जगातील सर्वात जास्त बुद्धिवंत माणसं ही भारतात आहेत, त्यामुळेच आपल्याला त्यांची किंमत नाही असंही उपहासाने ते म्हणाले. त्यानंतर कोणताही ब्रेक न घेता दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली कारण दार उघड वहिनी असं म्हणत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या आदेश बांदेकरांचं आगमन झालेलं होतं. गिरणगावातून सुरू झालेला प्रवास आजवर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कसा अविरत चालू आहे हे पहिल्यांदाच सर्वासमोर येत होतं. आजच्या या कोरडय़ा जगात ओलावा जपणारी माणसं खूप कमी सापडतात ती इथे भेटल्याचं त्यांनी नमूद केलं. सतत हसतमुख राहायचं असेल आणि सन्मानाने पुढे जायचं असेल तर काम मागण्याची कधी लाज वाटू देऊ नका. ज्या ठिकाणी आपण राहतो, त्या ठिकाणाला आपला अभिमान कसा वाटेल हे ध्यानात ठेवून काम केलं, की चेहऱ्यावरचं हसू कायम राहतं असंही ते म्हणाले. दुपारच्या जेवणानंतरच्या सत्राचे वक्ते खास जम्मूहून आलेले डॉ. अश्विनी जोजरा. सहयोग इंडिया या संस्थेचे संस्थापक आणि बेताची परिस्थिती असलेल्या एक हजाराहून अधिक मुलींची लग्नं लावून देणारं हे व्यक्तिमत्त्व. आयुष्यात कितीही प्रगती केली तरी त्यांचा गर्व करू नका हे सांगताना ते म्हणाले ‘मुझे फिर से जमिन पर आना है, इस सच्चाई से हवाई जहाज कभी मूंह नहीं फेर सकता.’ समाजाला जागृत करण्याआधी आपण स्वत: जागरूक होणं गरजेचं असल्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राला आनंदवनाच्या कामातल्या तिसऱ्या पिढीचे शिलेदार कौस्तुभ आणि पल्लवी आमटे उपस्थित होते. काळाबरोबर नवी आव्हानं स्वीकारतानाही ‘भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन राबा’ हा बाबा आमटेंचा मंत्र जपत असल्याचं ते म्हणाले. आनंदवनात उभ्या राहिलेल्या कामाचा सांभाळ आणि विस्तार करण्यासाठी पैशांची गरज आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त गरज आहे ती माणसांची, कारण This is not ''Amte & Sons Priv. Ltd.'' त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी पुढे येऊन हे कार्य पुढे नेण्यास हातभार लावावा असं ते म्हणाले. शिबिरातल्या शेवटच्या वक्त्या होत्या विक्रीकर विभागात डेप्युटी कमिशनर पदावर कार्यरत असलेल्या नागपूरच्या रेखाताई चोंडेकर. गेल्या तेरा वर्षांपासून पहाटे साडेतीन वाजता उठणाऱ्या, सायकलवरून फिरणाऱ्या क्लास वन अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. आजवर स्वत:च्या खात्याअंतर्गत अनेक धाडसी मोहिमा त्यांनी राबविल्या म्हणूनच एकाच महिन्यात तीन वेळा त्यांची बदली झालेली आहे, यावरून त्यांच्या कामाची पद्धत व कर्तव्यदक्षता लक्षात येते.
आनंदवनात शिबिराचं आयोजन केलं असल्याने आनंदवनाला भेट ही ठरलेली होतीच. तेव्हा साधनाताईंनाही भेटता आलं. ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो, तो क्षण जो पकडतो तो असामान्य ठरतो’ हा एका वाक्यात दिलेला मोलाचा सल्ला विचार करायला लावणारा होता. आजवर फक्त पुस्तकातून वाचलेलं व ऐकलेलं होतं पण प्रत्यक्ष आनंदवनात येण्याची ही पहिलीच वेळ, असे अनेकजण होते. समाजाने वाळीत टाकलेल्या परंतु इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत आणि स्वाभिमानावर उभ्या केलेल्या आगळ्या-वेगळ्या विश्वाचा कारभार थक्क करणारा आहे. तेथील प्लास्टिक पुनर्वापर युनिट, हस्तकला, हातमाग, सुतारकाम विभाग, गाडय़ा दुरुस्तीचं गॅरेज, युवाग्राम, गोशाळा, रोपवाटिका, संधी निकेतन या सर्वच विभागांत काम करणारे लोक अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने ही कामे चोखपणे करत असतात. फक्त शैक्षणिक पदवीच्या जोरावर सर्व काही मिळवता येत नाही याचं हे उत्तम उदाहरण. शिबिरातील सर्व सहभागींसाठी ही अतिशय महत्त्वाची शिकवण होती. त्यात आणखीन भर म्हणून सर्वासाठी खास आयोजित केलेला स्वरानंदवन हा आनंदवनातील कलाकारांचा ऑर्केस्ट्रा. आपल्या अपंगत्वावर मात करून सामान्य माणसालाही लाजवेल असा पर्फॉर्मन्स देणाऱ्या व आजवर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गोवा येथे आठशेहून अधिक प्रयोग केलेल्या या सर्व कलाकरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
बाबा आमटेंनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचं हे पंचवीसावं र्वष असल्याने या यात्रेत त्या वेळी सहभागी झालेल्या सर्वाना एकत्र येण्यासाठी आव्हान करण्यात आलं आहे. छोटू वरणगावकर, दगडू लोमटे, चंद्रकांत रागीट, संजय सोनटक्के, भूपेंद्र मुजुमदार हे त्यातलेच काही कार्तकर्ते या शिबिराच्या निमित्ताने येथे एकत्र आले होते. तसेच साताऱ्याचे डेंटिस्ट डॉ. अविनाश पोळ, अशोक बेलखोडे, प्रकाश ढोबळे हेही सहभागींशी संवाद साधायला व मदतीस आवर्जून उपस्थित होते.
शेवटच्या सत्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांतील सहभागींचे गट करून आपल्याला आपल्या जिल्ह्यात एकत्र येऊन समविचारी तरुण-तरुणींना एकत्र घेऊन काय काय कामे करता येतील यावर चर्चा झाली. आजवर सेवांकुरच्या शिबिरात सहभागी झालेल्या तरुणांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे जोडण्यात आलं असल्याने ही चर्चा फक्त तेवढय़ापुरतीच मर्यादित न राहता यातून काहीतरी साध्य होईल असा सर्वाचा प्रयत्न राहणार आहे. तसेच शिवम्, स्नेहालय, सर्च, सोमनाथ या शिबिरांमार्फत पुढे येणाऱ्या तरुणांचा सहभाग हा फक्त तेवढय़ापुरताच मर्यादित न ठेवता, त्यातील उत्सुक तरुणांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रयोगांवर काम करण्यासाठी वर्षांतून कमीतकमी दोन आठवडे आपला वेळ द्यावा ही संकल्पना पुढे आली व त्याला अनेकांनी आपली पसंतीही दर्शविली आहे. तीन दिवसांच्या या शिबिरात वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना जवळून समजून घेता आलंच पण त्यांच्याशी साधलेल्या संवादातून स्वत:ला काय करायचं हे प्रश्न थोडय़ाफार प्रमाणात का होईना सुटायला मदत झाली असं मत अनेक सहभागींनी आपले अनुभव सांगताना व्यक्त केलं.